कोल्हापूर, सांगलीत पुन्हा दक्षतेचा इशारा, ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अतिवृष्टी आणि पुरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील परिस्थिती अजूनही निवळली नसून जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीतच आहे. अशातच काहीसा पाऊस थांबल्यामुळे मदतकार्यास वेग आला होता आणि नागरिकांना दिलासा देखील मिळाला होता. मात्र हवामान विभागाने येत्या २४ ते ४८ तासांत पुन्हा एकदा याठिकाणी मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे भीतीचे सावट कायम असून पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक कार्यालयाने १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. विभागाने सांगितल्यानुसार १३ आणि १४ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडेल असे सांगितले आहे. याचबरोबर पुण्यातील काही भागात देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे.

कोकणातील मच्छीमार येत्या १५ ऑगस्टला म्हणजेच नारळी पौर्णिमेला समुद्राची पूरा करुन मासेमारीला सुरुवात करतात मात्र विभागाने रायगड जिल्ह्याला १६ तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा फटाक बसण्याची शक्यता असल्याचे सांगितल्याने मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात येऊ शकतो.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधील अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती ओढवून अनेकांजण मृत्युमुखी पडले होते. आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. आता परत मात्र अतिवृष्टी होऊन संकट ओढवल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरोग्यविषयक वृत्त