डहाणू जवळ मालगाडीच्या दोन डब्यांना आग

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन –  डहाणूजवळ मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना या आगीचा फटका बसला असून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक धीम्यागतीने सुरु आहे. या अपघातामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या वाटेतच रद्द करण्यात आल्या आहेत तर, काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

गुरुवारी रात्री उशिरा डहाणू – वाणगाव या स्थानकांदरम्यान मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागली. डब्यात प्लास्टिकचे ग्रेनील असल्याने ही आग झपाट्याने पसरत गेली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीमुळे ओव्हरहेड वायर आणि रुळाचे नुकसान झाल्याने डहाणू- विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याचा फटका विशेषत: लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या अजूनही खोळंबल्या आहेत. तर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक संथगतीने सुरू आहे. विरार – डहाणू या मार्गावरील उपनगरीय गाड्यांची सेवाही बंद असल्याने भाऊबीजेसाठी निघालेल्या नागरिकांचाही खोळंबा झाला आहे.

सकाळी साडेनऊ वाजल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. तरीही रात्रभर अनेक गाड्या वाटेत वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर अडकून पडल्या आहेत. तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे.

Loading...
You might also like