‘तिघाडीच्या भांडणात ती फाईल अडकली नाही ना ?’, आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्य सरकारनं कोरोनामुळं मंदावलेल्या रिअल इस्टेट मार्केटला दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. यावरून आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय चांगला असला तरीही रेडी रेकनरचे दर अजूनही जाहीर का होत नाहीत असा सवाल त्यांनी केला आहे. पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून टोल गोळा करत मुंबईत येत नाही ना ? या तिघाडीच्या भांडणात ही फाईल अडकली तर नाही ना ? असा सवालही शेलारांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. आशिष शेलार म्हणतात, “निधीसाठी केंद्र सरकारच्या नावानं ओरडणाऱ्यांनी राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल कमी करत मुंद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. चला चांगलं आहे. परंतु रेडी रेकनरच्या दरांचं काय ? ते का घोषित करत नाहीत ?”

आशिष शेलार म्हणतात, “रेडी रेकनरचे दर मार्चमध्ये कोरोनामुळं जाहीर झाले नाहीत. मे पर्यंत मुदतवाढ दिली. राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक पुणे यांच्याकडून मे मध्ये ही फाईल तयार झाली. परंतु ती ऑगस्ट संपला तरी मंत्रालयापर्यंत का पोहोचली नाही ? पुणे ते मुंबई प्रवासाला 3 महिने का लागतात ?”

आशिष शेलार असेही म्हणाले की, “पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून टोल गोळा करत मुंबईत तर येत नाही ना ? तिघाडीच्या भांडणात ती फाईल अडकली नाही ना ? मुंबई पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी पदयात्रा करून लक्ष्मीदर्शन तर करत नाही ना ? ही फाईल संशयाच्या बोगद्यात का अडकली आहे ?” असे अनेक सवाल त्यांनी केले आहेत.