‘कोव्हिशिल्ड’ व्हॅक्सीनचे नेमके काय आहेत साईड इफेक्ट? लँसेटच्या स्टडीमध्ये आलं समोर सत्य

पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात होत आहे. तर दुसरं म्हणजे, तिसऱ्या टप्यातील लसीकरण करण्यासाठी लसीचा जास्त पुरवठाच नाही. या लसीकरणासाठी जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केलीय. देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकचे कोव्हॅक्सिन याची लस दिली जात आहे. तर लस दिल्यानंतर काही दुष्परिणाम होतात का? सायन्स जर्नल लँसेटने केलेल्या एका निरीक्षणात लस दिल्यानंतर ४ जणांमागे एकाला लसीचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर हे दुष्परिणाम १ अथवा २ दिवसच येत असल्याचे समोर आले आहे.

प्रारंभी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने यामुळे धास्ती निर्माण झाली होती. परंतु, लसीकरण झालेल्यांच्या संख्येत हे प्रमाण क्षुल्लक राहिल्याने याची धास्ती कमी होऊ लागली होती. तर ऑक्सफर्ड एस्ट्राझिनेकाची लस किंवा फायझरची लस असो, दोन्ही लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत. ऑक्सफर्डची लस ही पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट बनवत आहे. तिला कोविशिल्ड असे नाव देण्यात आले आहे. तसेच, लँसेटने लसीचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये संशोधन केलं होत. यावरून दोन्ही लसींचे दुष्परिणाम दिसून आले. ८ डिसेंबर ते १० मार्च या कालावधीमध्ये ६,२७,३८३ नागरिकांचा सहभाग होता.

कोणते दुष्परिणाम पहा?
डोकेदुखी, लस टोचलेल्या ठिकाणी दुखणे, थकवा ही लक्षणे खूप सामान्य आहेत. परंतु हे दुष्परिणाम लस घेतल्यानंतर २४ तासांत अधिक प्रमाणावर जाणवतात तसेच आगामी २ दिवस सुरु असतात. काही लोकांना थरथरणे, डायरिया, ताप, गुडघेदुखी असे दुष्परिणामही जाणवले. तर किंग्स कॉलेजचे प्राध्यपक आणि संशोधक टिम स्पेक्टर यांच्या म्हणण्यानुसार, लस घेतल्यानंतर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये खूप कमी दुष्परिणाम दिसून आले. या नागरिकांनाच कोरोनाचा अधिक धोका आहे. परंतु, ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आणि महिलांमध्ये खूप अधिक दुष्परिणाम बघायला मिळाले.

दरम्यान, सिरमच्या कोव्हिशिल्डचा प्रथम लसीचा डोस दिल्यावर १२ ते २१ दिवसांच्या कालावधीत कोरोनाच्या संसर्ग रेटमध्ये ३९ टक्के घट झाली आहे. यामधील कालावधीत फायझरची लस घेतलेल्यामध्ये संसर्ग रेट ५८ टक्के घसरला आहे. २१ दिवस उलटल्यानंतर कोविशिल्ड लस ६० टक्के आणि फायझर ६९ टक्के संसर्ग रेट कमी आला आहे. तर टिम स्पेक्टर याच्या मते, आम्ही केलेल्या अभ्यासानुसार लस लावल्यानंतर सामान्य दुष्परिणाम आढळले आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. यावरून नागरिकांनी लस घेण्यासाठी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.