Coronavirus : ‘कोरोना’ रोखण्यासाठी आता ‘भिलवाडा पॅटर्न’, आहे तरी काय ‘हा’ पॅटर्न ? जाणून घ्या

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. याच दरम्यान देशात भिलवाडा पॅटर्न आदर्श बनत चालला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात हा पॅटर्न लागू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सार्वजनिक कर्फ्यू लॉकडाऊन, संपूर्ण लॉकडाऊन, कर्फ्यू लागू झाल्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राजस्थानमध्ये कोरोनाचे प्रथम केंद्र बनलेले भिलवाडा आता देशभरात प्रसिद्ध झाले आहे. आता कोरोनाशी लढण्यासाठी भिलवाडा मॉडेल देशात राबवण्यात येणार आहे.

भीलवाडा मॉडेल म्हणजे काय ?

राजस्थानमधील भिलवाडा येथे कोरोनाचा सामना करण्यासाठी अवलंबण्यात आलेले धोरण आता देशात राबवले जाऊ शकते. या ठिकाणी डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढली. मात्र, नंतर ही संख्या 27 पेक्षा जास्त रुग्णांपर्यंत पोहोचली नाही. कोरोनाचा रुग्ण सापडताच या ठिकाणी कर्फ्यू लागू करून शहराच्या सीमा सील करण्यात आल्या. शहरातील सर्व हॉटेल आणि खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली. लॉकडाऊचे नियम काटेकोरपणे पाळण्यात आले. घरोघरी स्क्रिनिंग करण्यात आले. लोकप्रतिनिधी, माध्यम आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनाही शहरात प्रवेश करण्यास परवानगी नाकारण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे काही अधिकाऱ्यांनाच फक्त शहरात प्रवेश देण्यात आला.

यामुळे भिलवाडा वाचला

भिलवाडा शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर या ठिकाणच्या लोकांनी सामाजिक अंतर पाळावे यावर जोर देण्यात आला. या सर्व प्रकारामुळे भिलवाडा येथे कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफने त्यांचे मनोबल उंचावले. त्याचाही परिणाम दिसून आला आणि बरेच रुग्ण बरे झाले. भिलवाडा येथे प्रशासकीय, पोलीस आणि वैद्यकीय यांच्या त्रिस्तरीय प्रयत्नांसह तेथील लोकांनीही सामाजिक अंतर पाळण्यावर भर दिला. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता आले. सध्या या ठिकाणी 20 दिवसांपासून कर्फ्यू सुरु आहे. मागील तीन दिवसांपासून शहर पूर्णपणे बंद केले गेले आहे. या ठिकाणी तीन हजार पोलीस कर्मचारी आणि डझनभर वरिष्ठ अधिकारी तैनात आहेत.

या मॉडेलची माहिती केंद्राने मागवली

भिलवाडा शहरात राबवण्यात आलेल्या पॅटर्नची माहिती केंद्र सरकारने मागवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गौबा यांनी राज्याचे मुख्य सचिव डीबी गुप्ता यांच्याकडून ही माहिती मागवली आहे. राज्याचे सचिव गुप्ता म्हणाले की, गौब यांनी या पॅटर्नचे कौतूक केले असून त्यांनी हा पॅटर्न संपूर्ण देशात राबवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त सचिव रोहितकुमार सिंह यांच्याकडून याबबतची माहिती घेतली आहे. भिलवाडा येथे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात एकाचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे घरोघरी स्क्रिनिंग करण्यात आले आणि 1 लाख लोकांची तपासणी करण्यात आली. पहिल्यांदा लॉकडाऊन आणि त्यानंतर कर्फ्यूचे काटेकोरपणे शहरवासियांनी पालन केले. ज्यांना लागण झाली आहे त्यांना तात्काळ दूर करण्यात आले. अशा लोकांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. ज्यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत.