पेट्रोल दरवाढीने शंभरी पार केल्यानंतर आ. रोहित पवारांचा सवाल, म्हणाले – ‘या दरवाढीच करायचं काय? तुम्हीच सांगा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या आठ दिवसात 5 वेळा इंधनदरवाढ झाली आहे. नव्या दरवाढीनंतर सोमवारी (दि. 10) राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर महाराष्ट्रातील परभणीतही पेट्रोल 100.20 रुपये लिटर झाले आहे. पेट्रोलने शतक ठोकल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करुन मोदी सरकारला टोला लगावला आहे. क्रिकेटमध्ये शतक झाल की आपण टाळ्या वाजवून खेळाडूचे अभिनंदन करतो. एखाद्याने वयाची शंभरी पूर्ण केल्यावरही अभिनंदन करतो. आता पेट्रोलच्या दरानेही शंभरी ओलांडली. या दरवाढीचे करायचे काय ? कमेंटमध्ये तुम्हीच सांगा, असा प्रश्न आमदार पवार यांनी नेटीझन्सला विचारला आहे.

रोहित पवार यांच्या ट्विटवर आणि फेसबुक पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये, मोदी सरकारचा निषेध करत केंद्र सरकारला ट्रोल केले आहे. मुंबईत पेट्रोल वाढून 97.86 रुपये लिटर, तर डिझेल 89.17 रुपये लिटर झाले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 91.53 रुपये, तर डिझेल 82.06 रुपये लिटर झाले आहे. भोपाळमध्ये 99.55 रुपये दरासह पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 102.42 ये लिटर आणि मध्यप्रदेशातील अनुपपूर येथे 102.12 रुपये लिटर झाले आहे. देशात पेट्रोल 100 रुपयांच्यावर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या पाच दरवाढीत पेट्रोल 1.14 रुपयांनी तर र डिझेल 1.33 रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात मोठी वाढ केली होती. या करवाढीनंतर सरकारी तेल वितरण कंपन्यांनीही वेळोवेळी दरवाढ करून पेट्रोल 21.53 रुपयांनी, तर डिझेल 19.18 रुपयांनी महागले आहे.