काय सांगता ! होय, मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वर मिळते 11 रुपयात चिकन बिर्याणी

मुंबई : कोणतेही सरकारी कंत्राट असेल तर त्याचा दर हा बाजारभावापेक्षा अधिक असतो, असे दिसून येते. अगदी १० रुपयात मिळणारा साबण सरकारी संस्था टेंडर काढूनच दुप्पट, तिप्पट दराने लाखोंच्या संख्येने खरेदी करत असल्याचे वर्षानुवर्षे दिसून येते. पण, त्याला मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान अपवाद आहे. तेथील कंत्राट मात्र बाजारात कोठेही दिसणार नाही आणि कोणालाही परवडणार नाही, इतक्या कमी दरात घेतली जातात. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पुरविणार्‍या खाद्यपदार्थाचे कंत्राट नुकतेच देण्यात आले. त्यातील दर पाहून आश्चर्याने तुमची बोट तोंडात जातील, पण ते खरे आहे.

या कंत्राटानुसार चिकन बिर्याणी केवळ ११ रुपये, दही मिसळ १० रुपये, व्हेज सँचविच १० रुपये, सुकामेवा १० रुपये, पावभाजी १५ रुपये, मसाला डोसा ११ रुपये, साबुदाणा वडा १० रुपयांत पुरविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री निवासस्थान आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगला या ठिकाणी खानपान सेवेचे कंत्राटात हे दर देण्यात आले आहेत. रस्त्यावरच्या हातगाडीवर साधा वडापावही आता १० रुपयाला मिळत नाही. पण या बंगल्यांमध्ये २५ वर्षापूर्वीच्या दरातच हे पदार्थ आता सुद्धा दिले जाणार आहेत. संसद भवन, विधीमंडळात पदार्थ स्वस्तात मिळत असले तरी त्यांना सबसिडी दिली जाते़ तशी कोणतीही सबसिडी येथे देण्यात येणार नाही़.एकूण ४४ पदार्थ केवळ ११०० रुपयात पुरविण्याच्या अटीवर हे कंत्राट मे़ सेंट्रल कॅटरर्स यांना देण्यात आली आहेत़.