युती झाली, काय असेल अनिल देसाईच्या मनात ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – असे म्हणतात की, कोणी जेवायचे नाव काढले तर नकार देऊ नये, एक घास तरी घ्यावा, नाही तर उपास घडतो. गेली साडेचार वर्षे एकमेकांची उणी दुणी काढणाऱ्या व स्वत:च्या बळावर लढण्याच्या राणाभीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या भाजप शिवसेनेची अखेर युती झाली. विद्यमान खासदारांना त्याचा सर्वाधिक आनंद झाला. या सगळ्या गदारोळात शिवसेनेचे खासदार अनिल देसाई हे मात्र पूर्णपणे बाजूला पडल्यासारखे झाले. युती झाल्यानंतर काय असेल त्यांच्या मनात असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, त्यांनी यावर काहीही न बोलता आतापर्यंत तरी मौन बाळगले आहे. साडेचार वर्षापूर्वी त्यांच्या हातातोंडांशी आलेले केंद्रीय राज्यमंत्री पद अक्षरश: हिरावले गेले ते कायमचे. जर युती करायचीच होती तर मला शपथ का घेऊन दिली नाही, असा विचार त्यांच्या मनात नक्कीच येत असणार.

हेही वाचा – पंतप्रधानांना पुलवामापेक्षा जाहीरसभा महत्वाची : शरद पवार 

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला युती तुटली. राज्यात भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या. पण बहुमत नसल्याने त्यांना शिवसेनेचा पाठिंबा घेण्याची वेळ आली होती. शरद पवार यांनी तातडीने भाजपला पाठिंबा दिला असल्याने भाजपच्या केंद्रातील नेत्यांचा शिवसेनेला विरोध होता. त्याचेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे ठरविले. त्यात शिवसेनेच्या वाट्याला एक राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र, त्यावेळी महाराष्ट्रात भाजप शिवसेनेला युती करण्याविषयी काहीही बोलायला तयार नव्हता. त्यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली होती. इकडे मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला. शिवसेनेने अनिल देसाई यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी अनिल देसाई हे दिल्लीला पोहचलेही. आता फक्त विमानतळावरुन बाहेर पडून राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घ्यायची इतकीच औपचारिकता राहिली होती. पण, त्याचवेळी मुंबईत शिवसेनेत वेगळीच खलबते सुरु होती. भाजपवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्याने शपथ घेऊ नये, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला गेला आणि दिल्ली विमानतळावर पोहचलेल्या अनिल देसाई यांना परत बोलविण्यात आले. शिवसेनेच्या या कृतीची एक दिवस चर्चा झाली.

शिवसेनेच्या या कृत्याने नाराज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा आपला वैयक्तिक अपमान मानला. त्यानंतर त्यांनी पुढच्या चार वर्षात शिवसेनेला देऊ केलेले मंत्रीपद पुन्हा कधी भरले नाही. रिपाईचे रामदास आठवले यांना मंत्रीपद दिले, पण शिवसेनेच्या कोट्यातील हे पद तसेच रिकामे ठेवले.

अगदी काही तासावर आलेले केंद्रीय मंत्रीपद अनिल देसाई यांच्या हातातून निसटले ते शेवटपर्यंतच. केंद्रीय मंत्री बनणारे देसाई हेही त्यानंतर राजकीय चर्चेतून काहीसे बाजूला गेले आहेत.

देसाई हे पक्षाचे सचिव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. २०१२ मध्ये डॉ. मनोहर जोशी यांची सदस्यपदाची मुदत संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना पहिल्यांदाच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना राज्यसभेवर पुन्हा संधी देण्यात आली आहे.

सध्या ते शिवसेनेचे खासदार असले तरी कुठल्याही चर्चेत नसतात. आता युती झाली. लोकसभेच्या विद्यमान खासदारांनी आपली सीट पक्की झाल्याचा आनंद व्यक्त केला. तेव्हा अनिल देसाईच्या मनात काय आले असेल. युती करायचीच होती तर मला शपथ का घेऊन दिली नाही, असा प्रश्न त्यांना आता नक्कीच सतावत असेल.