घरोघरी जाऊन ‘तिनं’ बांगडया विकल्या, मुलाला ‘कलेक्टर’ बनवलं अन् त्यानं नेलं आईला ऑफीसमध्ये !

रांची : वृत्तसंस्था – झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी अडाणी आईने कशाप्रकारे जिल्हाधिकारी मुलगा घडवला याविषयी फेसबुक अकाऊंटवरुन लेख लिहून माहिती दिली आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे मूळ निवासी असलेल्या जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी लिहिलेली ही कथा अनेकांचे मन हेलावून टाकत आहे.

घोलप यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते आपल्या आईसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिसत असून ते स्वत: खुर्चीवर बसले आहेत. तर त्यांच्या आईने मायेने त्यांच्या खांद्यांवर हात ठेवला आहे. या फोटोसोबतच #तिला_काय_वाटत_असेल?” या टॅगलाईनने एक लेख लिहिला आहे.

या लेखामध्ये त्यांनी त्यांच्या आईने केलेला संघर्ष व आईने घालून दिलेल्या आदर्शांनुसारच आपण काम करत असताना तिला काय वाटत असेल याविषयी माहिती या लेखातून दिली आहे. अशिक्षित असणाऱ्या आईने पोरांना शिकवण्यासाठी गावोगावी फिरून बांगड्या भरल्या. पतीला दारू पिण्याचं व्यसन आहे हे समजल्यानंतर कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत ती कणखर बनली. पतीच्या निधनानंतरही तिने बांगड्या विकण्याबरोबरच मजुरीही सुरु केली आणि मुलांना घडवले. मुलगा कलेक्टर झाल्यानंतर आपण जे भोगलं असेच भोगणारे अनेक लोक आहेत त्यांचा विचार करत जा आणि त्यांना मदत करत जा असे त्यांच्या आईने सांगितले आहे. आज लोकांना मदत करताना पाहून आईला काय वाटत असेल याविषयी लिहले आहे.

रमेश घोलप यांच्या अकाउंट वरून अनेकांनी हा फोटो आणि लेख शेअर करून त्यांच्या कार्याला व त्यांच्या आईने केलेल्या संघर्षाला सॅल्युट केला आहे. रमेश घोलप 2012 ला आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ते सद्या झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –