सत्ता स्थापनेचा भाजपाचा नेमका आहे तरी काय ‘प्लॅन’ ?, PM मोदींच्या कौतुकानंतर चर्चेला ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक, त्याचवेळी दुसरीकडे मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार न देण्याचा भाजपाचा निर्णय आणि त्यानंतर सायंकाळी शरद पवार यांनी सोनिया गांधींशी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चाच झाली नसल्याचे सांगितले. त्याचवेळी भाजपाचे नेते भाजपाशिवाय राज्यात स्थिर सरकार येऊ शकत नाही, असे सांगत आहेत.

या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाचा नेमका काय प्लॅन आहे, यावर चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाशिव आघाडी तयार होत असल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही पक्षांच्या स्वतंत्र आणि परस्परांबरोबर बैठका होत आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे असल्याने त्यांनी भाजपाबरोबरची युती तोडली आहे. केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. असे असले तरी भाजपा शिवसेनेविरोधात जाहीर वक्तव्य करत नाही.

मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय भाजपा ने घेतला. त्यामागे शिवसेनेला चुचकारण्याचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाकडे नेहमीच संशयाने पाहिले जाते. त्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाचे कौतुक केले. या पक्षाचे खासदारांनी कधीही सभागृहाच्या हौद्यामध्ये येऊन गदारोळ माजविला नाही, अशा शब्दात हे कौतुक केले. मोदी यांच्या भाषणातील प्रत्येक वाक्य हे नेहमीच काहीतरी सुचित करणारे असते. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक करण्यामागे काय कारण अशी चर्चा होऊ लागली आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सुमारे एक तास झालेल्या भेटीनंतर शरद पवार यांनी या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी सांगून एकच गुगली टाकला. त्याचवेळी किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चाच झाली नसल्याचे सांगून शरद पवार यांनी एकदम यु टर्न घेतला.

त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनीही सत्ता स्थापनेसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण पवार यांची भेट घेतली असे सांगितल्याने पुन्हा चर्चेला वेगळे वळण मिळाल्याचे दिसू लागले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची चलबिचल होत आहे का असे बोलले जाऊ लागले आहे.

Visit : Policenama.com