Online पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकलांय ?, मग जाणून घ्या पुढं काय होऊ शकतं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अलीकडे ऑनलाइन बँकिंग प्रणालीमुळे काही मिनिटांतच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरण केले जाते. त्यासाठी बँकांनी ग्राहकांच्या सोयीनुसार अ‍ॅप डिझाइन केले आहेत. तथापि, यंदाच्या वर्षी पैसे हस्तांतरण करण्याच्या नियमांत बदल करण्यात आले होते. समजा तुम्ही ऑनलाइन पैसे हस्तांतरण करताना जर चुकीचा IFSC (Indian Financial System Code) कोड टाकला असेल, तर काय होईल? पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जातील का? असे सवाल उपस्थित होतात. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.

पैसे हस्तांतरण करण्यासाठी IFSC कोड आवश्यक

एनइएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएसच्या माध्यमातून पैसे हस्तांतरण करण्यात येते. मात्र, एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरण करण्यासाठी सर्वात आदी आपणास त्या व्यक्तीस बेनिफिशरी म्हणून जोडावे लागेल. त्याशिवायही काम करता येते. त्यासाठी बेनिफिशरी जोडण्याकरता ज्यावेळी उर्वरित माहिती भरली जाते, तेव्हा, खाते क्रमांक आयएफएससी कोड आवश्यक असतो.

IFSC म्हणजे काय ?

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सर्व बँकांना ११ अंकाचा आयएफएससी कोड दिला असून, यातील पहिले ४ अंक अक्षरांत असतात, जे बॅंकचे नाव सांगतात. यातील पाचवा अंक हा ० असतो आणि शेवटचे अंक बँकेची शाखा कोणती आहे, ते दर्शवतात.

पैसे हस्तांतरण करताना चुकीचा IFSC कोड टाकल्यास काय होईल ?

ऑनलाइन पैसे हस्तांतरण करताना चुकीचा IFSC कोड टाकल्यानंतर सुद्धा व्यवहार होऊ शकतात. पण ज्याला पैसे हस्तांतरण करायचे आहे त्याचा खाते क्रमांक आणि नाव योग्य असले पाहिजे. उदा. तुमचे खाते बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुंबई शाखेत आहे. ऑनलाइन हस्तांतरण करताना मुंबई शाखेच्या IFSC कोड ऐवजी तुम्ही पुण्याच्या शाखेचा IFSC कोड टाकला. तरी पैसे हस्तांतरण होतात. जरी कोड बदलला गेला असला तरी बँक खाते क्रमांक अचूक असेल, तर व्यवहार होणे शक्य आहे.

दुसरी शक्यता…

IFSC कोड टाकताना काही चूक झाली, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रच्या जागी स्टेट बँक ऑफ इंडियाचा कोड टाकला, तर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात हस्तांतरण होतात. दरम्यान, हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळी ग्राहकाचा खाते क्रमांक दोन्ही बँकेत एकच असतो. नाहीतर याची शक्यता फार कमी आहे. कोड अथवा खाते क्रमांक जुळत नसल्यास, हे हस्तांतरण होणार नाही.