Coronavirus : तिसरी लाट टाळण्यासाठी भारताला ‘या’ गोष्टी करणे अत्यावश्यक

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे हे संकट केव्हा जाईल याच प्रश्नाने अनेकजण चिंतेत आहेत. असे असताना आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विषय येऊन ठेपला आहे. आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर लसीकरणावर भर देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात कोरोनाची पहिली लाट जेव्हा आली तेव्हा संपूर्ण देशभरात भीतीचे वातावरण होते. त्यानंतर देशातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, आता या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्ययंत्रणाही अडचणीत सापडल्या आहेत. वैद्यकीय सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. तिसरी लाट ही अत्यंत मोठी असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वेगवान लस निर्मिती आणि मोठी गुंतवणूक हाच प्रभावी उपाय आहे.

जुलैपर्यंत दरमहिन्याला कोवॅक्सिनचे 10 कोटी डोस तयार केले तरीही ते अत्यंत कमी असतील. सध्या अमेरिकेने कच्चा माल देण्याचीही तयारी दाखवली आहे. त्यामुळे तिसरी लाट टाळण्यासाठी महिन्याला 50 कोटी डोस निर्मितीचे लक्ष्य आवश्यक आहे. भारत बायोटेकने संपूर्ण जबाबदारी स्वतःवर न घेता इतर उत्पादकांनाही परवानगी देणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

तसेच भारताने कोव्हिशिल्ड आणि रशियाची स्फुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीमध्येही मोठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. केंद्र सरकार विविध निर्मात्यांकडून लस निर्मिती करून घेऊ शकते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट खरोखरच टाळायची असल्यास सर्वात आधी प्रत्येकाचे लसीकरण करणे महत्वाचे आहे.