“महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा आमदार मंत्री होतो या पेक्षा मोठं दुर्दैव ते काय” : निलेश राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक दिवसांपासून चर्चेत आणि प्रतीक्षेतील मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात १३ नवीन नेत्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली तर ६ जणांना डच्चू दिला गेला. शिवसेनेतून आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रिपदाबाबत मात्र महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा शिवसेना आमदार तानाजी सावंत महाराष्ट्रात मंत्री होतो या पेक्षा मोठं दुर्दैव ते काय…” असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातत ८ कॅबिनेटमंत्री तर ५ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपतून १०, शिवसेनेतून २ तर रिपाइं आठवले गटातून एका नव्या मंत्र्याचा समावेश आहे. शिवसेनेतून मंत्रिपद दिल्या गेलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांचा समावेश आहे.

काय म्हणाले होते तानाजी सावंत :
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान तानाजी जाधव म्हणाले होते कि , “काही लोकांचा गैरसमज झाला असेल की तानाजी सावंत भिकारी-बिकारी झालाय. पण तस काहिही नसून हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. सव्वाशे-दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करायला मला फारसं काही लागत नाही. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण हा तानाजी सावंत कधीही भिकारी बनणार नाही.” यानंतर त्यांचावर मोठ्याप्रमाणात टीका सुद्धा झाली होती. त्यांच्या या वक्तव्याचा विडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे टीकेमध्ये :
तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊन्ट वरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवून स्वतः श्रीमंत होण्याची भाषा करणाऱ्याला शिवनेकडून मंत्रिपद दिले जाते हे मोठे दुर्दैव असल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले. सावंत यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा व्हिडिओ देखील निलेश यांच्या ट्विटर अकाउंट वर एकाने शेयर केल्याचे दिसून आले. मंत्रिपद दिलेले दोनही नेते शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस कडून आयात केले असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंना त्यांच्याच पक्षातील लोकांची त्यांना खात्री नसल्याचे निलेश राणेंनी म्हटले.