A आणि B फॉर्म म्हणजे ‘एबी’ फॉर्म म्हणजे काय रे भाऊ, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात सर्वच पक्ष निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. यादीत नावे जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले जात आहेत. आता हे ‘एबी फॉर्म’ म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल. याठिकाणी आम्ही तुम्हाला ‘एबी फॉर्म’ म्हणजे काय आणि त्याची गरज का ? इत्यादी माहिती देत आहोत.

‘एबी फॉर्म’ म्हणजे काय ?
‘एबी फॉर्म’ दिला गेलेला संबंधित उमेदवार हा तिकीट देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचं अधिकृत चिन्हंही दिलं जातं. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत याच ‘एबी फॉर्म’ ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या पक्षाची उमेदवारी आणि चिन्ह मिळण्यासाठी ‘एबी फॉर्म’ हा महत्त्वाचा आणि अनिवार्य दस्तावेज असून त्यामुळे उमेदवाराला पक्षाची अधिकृत मान्यता मिळाल्याचे जाहीर होत असते.

– ए फॉर्म’ वर पक्षाने तिकीट वाटपासाठी नेमलेल्या अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी असते. ज्याद्वारे उमेदवाराला मान्यता मिळते.

– ‘बी फॉर्म’ हा ऐन प्रसंगी समस्या निर्माण झाल्यास बॅकअप प्लॅन चा भाग असतो. पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नावं असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर निवडणूक आयोग या दुसऱ्या मान्यताप्राप्त उमेदवाराला अधिकृत म्हणून मान्यता देतो.

उमदेवारीच्या वेळी एखाद्या पक्षाकडून तिकीट घेऊन निवणुकीचा फॉर्म भरणाऱ्या उमेदवाराला ‘एबी फॉर्म’ द्यावाच लागतो. तो ‘एबी फॉर्म’ सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयतही ग्राह्य धरला जात नाही. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी आणि कागदपत्रे अगदी काटेकोरपणे तपासले जातात. त्यात ‘एबी फॉर्म’ हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो.

या ‘एबी फॉर्म’ मध्ये उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज भरताना काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरु शकतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून ‘बी’ फॉर्म दिला जातो.

Visit : policenama.com