INX मीडिया घोटाळा आहे तरी काय ? चिदंबरम यांचा काय संबंध ? संपूर्ण कुटूंबीय गोत्यात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांच्यावर ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मंगळवारी रात्रीपासून सीबीआय आणि ईडीचे पथक त्यांच्या मागावर आहे. पी चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स कंपनीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.

काय आहे नेमकं INX कंपनी बाबतच सत्य –

आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (FIB) स्वीकारला होता. अर्थमंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.

आयएनएक्स मीडियाने अनधिकृत पद्धतीने आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ % गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. यामुळे फक्त ४.६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकी गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली.

या मोबदल्यात कार्ती यांच्याशी संबंधीत कंपन्यांमध्ये साडे तीन कोटींहून अधिक रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे.

प्राप्तिकर खाते आणि महसूल विभागाने या प्रकरणात कंपनीला नोटीसही बजावली. मात्र, त्यावेळी कार्ती चिदंबरम कंपनीच्या मदतीला धावून आले, असे सांगितले जाते. त्यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा वापर करत कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली. त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.

सीबीआयने या प्रकरणात मे २०१७ मध्ये कार्ती चिदंबरम, त्यांची चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी, तसेच अॅडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीच्या पद्मा विश्वनाथन, आयएनएक्स मीडियाचे संचालक पीटर व इंद्राणी मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

आयएनक्स मीडिया ही पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत.

चिदंबरम कुटुंबियांवर गंभीर आरोप –
पी चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यात कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप आहे. मुलगी कार्ती यांच्यावर राजस्थान रुग्णवाहिका गैरव्यवहाराप्रकरणी आरोप झाले होते. एअरसेल- मॅक्सिस प्रकरणातही चिदंबरम पिता-पुत्रांवर आरोप झाले होते.