पुण्याच्या ‘आखाड्या’त शिवसेना ‘सध्या काय करतेय’ ?

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी कशी करायची ? या पेचात शिवसेना अडकली असून शहरातील आठ मतदारसंघापैकी कोणते मतदारसंघ वाट्याला येतील कि स्वतंत्र लढायचे … नक्की काय करायचे ? या प्रश्नांनी शिवसेनेतील इच्छुकांना ग्रासले आहे.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रबळ झालेल्या भाजपमुळे आगामी काळात कोणते समीकरणे उदयास येतात यापेक्षा शहरात शिवसेना सध्या काय करतेय ? हाच मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला जनतेने भरभरून मतदान करून दुसऱ्यांदा संधी दिल्याने भाजपचा आत्मविश्वास आणखी बळावला आहे.

पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भूमिकेला आता मोठे महत्व प्राप्त झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शहा हे ठरवतील त्यानुसारच महाराष्ट्रात युतीचा ‘संसार’चालणार आहे मात्र त्यामुळे शिवसेनेची कोंडी होणार हे अटळ असले तरी घटकपक्षांसाठी जागा देण्याचा ‘तोडगा’ भाजपच्या पथ्यावर पडणार आहे.

नेमक्या या पार्श्वभूमीवर पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक आतापासूनच धास्तावले आहेत. नेमके करायचे काय ? आणि व्यक्तिगत राजकीय अस्तित्वाचे पुढे काय ? या प्रश्नांनी या सेनेतील इच्छुकांना ग्रासले आहे. त्यात जागावाटप हा मुद्दा राज्यात काय पुण्यात कळीचा ठरणार आहे. त्यात कुणीही जागावाटपाबाबत बोलायचे नाही असे फर्मान ‘मातोश्री ‘ वरून काढण्यात आल्याने विधानसभेची तयारी नक्की काय करायची ?

या पेचात पुण्यातील शिवसैनिक अडकले आहेत. पुण्यात लोकसभा निवडणुकीत युतीतील भाजपने हवा तसा प्रतिसाद दिलाच नाही उलट अवहेलना केल्याची तक्रारही शिवसैनिकांची आहे. आता पुण्यातील आठ मतदारसंघापैकी शिवसेनेच्या वाट्याला किती येतील ?

यावर तर्कवितर्क सुरु झाले आहेत ; पण सद्यस्थितीत पालिकेवर भाजपचाच अंकुश आहे आणि आठही आमदार भाजपचेच आहेत मग ते जागा कशा काय सोडतील हा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात असून काँग्रेसला ज्या पद्धतीने भाजपने पुण्यातून संपवले, त्याच धर्तीवर पुणे पॅटर्नचा प्रयोग करून सत्तेत सामावून घेताना नामधारी ठेवण्याची खेळी करणाऱ्या राष्ट्रवादीचे वर्चस्वच काय अस्तित्वही उपनगरातून ‘ हद्दपार’ करण्याचे भाजपचे मनसुबे आहेत.

त्यामुळे जरी लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभा एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता,तो ऐनवेळी बदलला जाऊ शकतो असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची पुण्यात सहा लाखांची ‘व्होट बँक ‘ झाली आहे. त्यात सेनेचे किती ?

या प्रश्नालाच तिलांजली मिळाली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला ८९ दिवस राहिलेले असताना कोणत्या मतदारसंघातून तयारी करायची ? या प्रश्नाने शिवसेनेला ग्रासले आहे. त्यामुळे काही जण आपले राजकीय अस्तित्व आणि आमदारकीची मनीषा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या पक्षात ‘वर्णी ‘ बसेल का ? याची चाचपणी करीत आहेत.

तर भाजपच्या गोटात आठ पैकी पाच आमदार ‘रिपोर्ट कार्ड ‘ च्या धास्तीने अस्वस्थ झाले आहेत. भाजपने पर्यायाने अमित शहा यांनी ‘आम्ही जो कुणी देऊ ,तो निवडून आणू ‘ ही घेतलेली भूमिका प्रत्यक्षात साकार करून दाखवलेली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना आपला पत्ता कट करून नवख्या व्यक्तीला उमेदवारी जाते कि काय ? या चिंतेने ग्रासले आहे.

तर शिवसेनेमध्ये इच्छुकांनी आपापसातील ‘आमदारकी’च्या स्पर्धेला बाजूला सारून मतदारसंघ कसा मिळेल यासाठी एकीची मोट बांधली आहे. प्रामुख्याने शिवाजीनगर, कोथरूड , वडगावशेरी आणि हडपसर या मतदारसंघावर जागा वाटपात दावा ठोकायचा अशी रणनीती स्थानिक पातळीवर आखण्यात आली आहे;पण घटक पक्षांना जागा द्यावी लागणार आहे आणि भाजपचे धोरण काय यावर शिवसेनेची भिस्त अवलंबून आहे.

त्यात कसबा असो किंवा कोथरूड, शिवाजीनगर, कॅंटोन्मेंट , वडगावशेरी, पर्वती या मतदारसंघात भाजपचे प्रस्थ वाढलेले असून शिरूर आणि बारामतीत लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसर व खडकवासला या विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचे पूर्वीचे सोईचे असलेले ‘ गणित ‘ फिस्कटलेले आहे . कोथरूडचा बालेकिल्ला तर कधीच हातचा निसटून गेलेला आहे.

त्यामुळे या सर्व मतदारसंघात भाजपच अव्वल आहे. त्यामुळे पूर्वीचे दाखले देऊन ‘ हा मतदारसंघ आमचा ,तो तुमचा’ या सेनेच्या मागणीला भाजपकडून दाद मिळणार नाही उलट आम्ही आता सर्वत्र प्रबळ आहोत ,हे खडे बोलही भाजपकडून ऐकावयास मिळण्याची दाट शक्यता असल्याने शिवसेनेतील इच्छुक आता काय करायचे? या विवंचनेतच आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

डासांचा प्रादुर्भाव, मलेरिया रोखण्यासाठी ‘कोळी’च्या विषाचा उपाय

धक्कादायक ! प्रदूषणामुळे भारतात लाखो मुलांना गमवावा लागतो जीव

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !