आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवल्यास ‘हा’ असणार मतदारसंघ ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. त्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास 100 टक्के आवडेल, पण हा निर्णय स्वत: आदित्य किंवा उद्धवजी घेतील, असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हंटले आहे. त्यासोबतच युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांच्या ‘हीच वेळ आहे… हीच संधी आहे. लक्ष्य- विधानसभा 2019, महाराष्ट्र वाट पाहतोय आदित्य ठाकरे..’ या इन्स्टाग्राम पोस्टनंतर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत.

मिलिंद ठाकरे यांनी याबाबत म्हंटले आहे की, निवडणूक लढवण्याचा निर्णय आदित्य ठाकरे स्वत: किंवा उद्धव ठाकरे घेतील. निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. आदित्य ठाकरे जो निर्णय घेतील त्यांचं शिवसैनिक स्वागत करतील. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास त्यांचा मतदारसंघ कोणता असेल, हा प्रश्न विचारला असता, संपूर्ण महाराष्ट्रच आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल असं उत्तर मिलिंद नार्वेकर यांनी दिलं.

मुंबईमधील काही महत्वाच्या मतदारसंघांची चाचपणी आदित्य ठाकरेंसाठी झाली आहे. त्यात वरळी, शिवडी या शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघांचा यात समावेश आहे. तर आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी, असा मतप्रवाह देखील आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यासाठी आग्रही आहेत.

आदित्य ठाकरेंना मिळणार उपमुख्यमंत्री पद ?

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरे सुभाष देसाईंच्या नावासाठी आग्रही आहेत, मात्र देसाईंच्या नावाच्या चर्चेमुळं शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याचा शिवसेना पक्षप्रमुखाचा इरादा तर नाही ना ? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराआधी आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं केलं, तर येणारी विधानसभा निवडणूक त्यांना लढवावी लागेल. जर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं धाडस दाखवलं नाही तर शिवसेनेला आदित्य ठाकरेंसाठी विधानपरिषदेतल्या एका आमदाराची जागा रिक्त करावी लागेल. दरम्यान ठाकरे कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याने प्रत्यक्ष निवडणूक लढवलेली नाही.