‘या’ दहा जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कडून जोरदार तयारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे तसतशी राजकीय वर्तुळात चर्चांची सरबत्ती झडू लागली आहे. मोदी लाटेत भाजून निघालेल्या राष्ट्रवादीला आगामी लोकसभा निवडणुकीत गत वेळेची परिस्थिती सुधारायची आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच रणनीती आखल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. किमान दहा ठिकाणी पक्षाच्या संघटनाच्या जोरावर विजय खेचायचा इरादा बारामतीकरांनी बांधला आहे. या दहा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची वास्तविक परिस्थिती नेमकी काय आहे हे देखील पाहण्यासारखे आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ
बारामती मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गत वेळी या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या विजयी झाल्या होत्या तर त्यांचे मताधिक्क कमालीचे घटवण्यात महादेव जानकर यशस्वी झाले होते. या वेळी तर मोदींनी या मतदारसंघात लक्ष घालण्याचे ठरवले असल्याने हा मतदारसंघात चर्चेत आला आहे. मात्र या वेळी हि मैदान जिंकण्यात राष्ट्रवादी यशस्वी होईल असे चित्र सध्या तरी पाहण्यास मिळते आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
कोल्हापूरचे राजकारण राष्ट्रवादीच्या कव्हेतून निसटत असल्याचे सध्या तरी चित्र आहे मात्र ऐन निवडणुकीच्या काळात निकाल फिरवण्यासाठी पवारांची रणनीती प्रसिद्ध आहे. धनंजय महाडिक यांची साथ कोणत्याही परिस्थितीत द्यायची नाही असा निर्धार सतेज पाटलांनी केला असला तरी सतेज पाटील आघाडीचा धर्म पाळतील असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ
सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास येऊ लागला आहे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजेंनी या मतदारसंघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. या वेळी हि त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने केला असून त्यांच्या विजयाची राष्ट्रवादीला खात्री आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ
माढा मतदारसंघ मागील काळात चांगलाच चर्चेत आला होता. कारण या ठिकाणी शरद पवारांचे नातू रोहित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार असणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र या मतदारसंघात आपला नातू उभा केल्यास पक्षाला तोट्याची दिवाळी बघावी लागेल हे चाणाक्ष नेते शरद पवार यांनी हेरले आणि रोहित पवार यांच्या उमेदवारी बाबतची चाचपणी थांबवली. आता विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जाते आहे. या ठिकाणी भाजपकडून सुभाष देशमुख उमेदवारी करण्यास तयार आहेत असे बोलले जाते आहे. तर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे हि भाजप कडून इच्छुक आहेत असे बोलले जाते आहे. विजयसिंह राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तरच हा मतदारसंघ राष्ट्रवादी राखू शकते असे अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघ
आढळराव पाटील यांनी सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कात्रजचा घाट दाखवत दिल्ली गाठलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर मतदारसंघ. या वेळी हि या ठिकाणी आढळराव पाटील विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. तर त्यांना मंगलदास बांदल यांचे आवाहन सहन करावे लागणार आहे. बांदलांचा पक्ष निश्चित नसला तरी लोकसभा निवडणूक लढवण्याचे मात्र निश्चित झाले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी झाले. त्यांना या वेळी तिकीट मिळेल का या बाबत निश्चित सांगता येत नाही. कारण प्रफुल्ल पटेल यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. तर भाजपला या मतदारसंघात तगडा उमेदवार मिळत नाही असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघ
रायगड मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना निसटत्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची कसर भरून काढण्यासाठी सुनील तटकरे कामाला लागले आहेत. या मतदारसंघात अनंत गीते यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार असून या ठिकाणचा अंदाज भल्या भल्यांना बांधता येत नाहीत.

मावळ लोकसभा मतदारसंघ
शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून हा मतदारसंघ उदयाला येऊ लागला आहे. मात्र अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेने राजकारणात चांगलीच खळबळ माजली होती. श्रीरंग बारणे यांनाच शिवसेना या वेळी देखील तिकीट देऊ करणार असून राष्ट्रवादीचा उमेदवार या मतदारसंघात अद्याप निश्चित नाही. मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ जिंकण्याचा चंग मात्र बांधला आहे.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ
या मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव गतवेळी विजयी झाले होते मात्र आता युती झाली नाही तर शिवसेनेला हा मतदारसंघ हातचा गमवावा लागणार आहे. तर या मतदारसंघात राष्ट्रवादी चांगलीच प्रबळ झाली असल्याचे पाहण्यास मिळते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सुरु केली असून स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर या मतदारसंघात निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी जिंकण्याची शक्यता अधिक आहे असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघ
परभणीचे आमदार राहुल पाटील आणि खासदार संजय जाधव यांच्यात सध्या चांगलीच तेढ आहे. दोघेही शिवसेनेचे असताना दोघात संघर्ष उचल खातो आहे. येत्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळतो कि काय अशी अवस्था आहे. परभणी शहरातील राजकारण आणि जिल्ह्यात शिवसेनेची निसटणारी पकड याचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी या निवडणुकीत आपला खासदार या मतदारसंघातून बनवणार असे एकंदर चित्र आहे. राष्ट्रवादी कडून राजेश विटेकर हे इच्छुक असून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याचा संभव अधिक आहे. तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले तर शिवसेनेला हा मतदारसंघ हातचा गमवावा लागणार आहे.