सुपे घाटामध्ये लुटमार करणारी टोळी अटकेत, आरोपी आणि ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचे नेमके ‘कनेक्शन’ काय ?

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन टीम – दौंड आणि बारामती तालुक्याच्या वेशीवर असणाऱ्या सुपे-पडवी घाटामध्ये प्रवाश्याला लुटणाऱ्या टोळीतील दोघांना यवत पोलिसांनी जेरबंद केले असून टोळीतील मुख्य सूत्रधार मात्र फरार झाला आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये सागर उर्फ सोन्या जालिंदर सूर्यवंशी वय २५ वर्षे, महादेव ऊर्फ महाद्या रामा जाधव वय २४ वर्षे दोघे रा.वरवंड, ता. दौंड यांचा समावेश असून त्यांचा मुख्य साथीदार सागर अरुण टिळेकर रा.पडवी, ता.दौंड हा फरार झाला आहे. याबाबत लिंगादेव निवृत्ती पांढरे वय २४ वर्षे राहणार बोरा प्लाझा, रेव्हेन्यू कॉलनी, शिरूर मूळ रा.पुळूज ता.पंढरपूर यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी लिंगादेव निवृत्ती पांढरे हे दि.४ जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पळूज या गावावरून येऊन शिरूर येथे जाण्यासाठी सुपा चौफुला शिरूर रोडवर उभे होते. त्यावेळी एक पल्सर दुचाकी स्वाराने त्यांच्याजवळ येऊन चौफुला येथे जायचे आहे का असे विचारून त्यांना त्या दुचाकीवर बसवून पडवी-सुपा घाटामध्ये आणले. यावेळी अगोदरच घाटात थांबलेल्या दोघांनी व दुचाकीस्वाराने त्यांना मोटरसायकल वरून खाली उतरवत हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादी लिंगादेव पांढरे यांच्याजवळ असणारा १० हजारांचा मोबाईल फोन, ११ हजार रोख रक्कम आणि बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड व त्याचा पिन नंबर असा ऐवज घेऊन तू याची तक्रार कुठे दिली तर तुला जीवे मारू अशी धमकी देऊन पसार झाले होते.

शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी फिर्यादी हे त्यांचे मूळ गाव पुळूज येथे जाण्यासाठी शिरूर येथून बसने चौफुला  येथे उतरले असता त्यांना समोर  बजाज पल्सर २२० मोटरसायकल व तिच्या शेजारी उभ्या असलेल्या दोन व्यक्ती दिसल्या ज्यांनी त्यांना सुपे घाट येथे रात्रीच्या वेळी लुटले होते. यानंतर फिर्यादीने पोलिसांशी संपर्क साधून सदर व्यक्तींबाबत माहिती दिली यावेळी यवतचे पोलिस नाईक पोटे व बनसोडे यांनी त्वरित चौफुला येथे धाव घेत सदर मोटरसायकल व त्या दोघांना पकडले त्यांची नाव पत्ता विचारले असता त्यांनी सागर उर्फ सोन्या जालिंदर सूर्यवंशी,  महादेव ऊर्फ महाद्या रामा जाधव असे सांगितले यावेळी पोलिसांनी सागर उर्फ सोन्या याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये लुटमारीमध्ये चोरलेला मोबाईल मिळून आला या दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता त्या दोघांनी व त्याच्यासोबत सागर अरुण टिळेकर असे तिघांनी मिळून दिनांक ०४ जुलै रोजी रात्री फिर्यादीला मारहाण करून  वरील प्रमाणे वस्तू जबरदस्तीने चोरून नेल्याचे कबुल केले.

सुपे घाटामध्ये लूटमार करणारे आरोपी हे अनेक महिन्यांपासून एका पोलीस कर्मचाऱ्या सोबत रात्री अपरात्री केडगाव, चौफुला व पडवी परिसरामध्ये गाड्यांवर फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले असून त्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत हे आरोपी  मध्यरात्रीच्या सुमारास लोकांचे वाढदिवस, पार्ट्या करताना दिसून आलेले आहेत. त्यामुळे या आरोपींचे आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नेमके कनेक्शन काय? असा प्रश्न अनेकांना पडला असून टोळीचा खरा मास्टरमाईंड नेमका कोण? आणि त्याला आता शोधण्यात येईल का याबाबतची चर्चा सध्या केडगाव-चौफुला परिसरामध्ये चांगलीच रंगत आहे. त्यामुळे या मागचे खरे मास्टरमाईंड शोधून काढून पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –