आरे देशाचा मजाक लावलाय का ? ; मोदींच्या ‘त्या’ मुलाखतीवर राज ठाकरे संतापले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीवरून निशाणा साधला आहे. देशाच्या पंतप्रधानांना आपण काय प्रश्न विचारावेत हेही कळत नाही असे म्हणत मोदीजी तुम्ही आंबा कसा खातात ? असा प्रश्न पंतप्रधानांना विचारतात का ? अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पनवेलमध्ये जाहीर सभा झाली. त्यावेळी राज ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरून निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले, ‘ते अक्षय कुमार पंतप्रधानांची काल मुलाखत घेत होते. काय लोडेड प्रश्न आमच्या पंतप्रधानांना विचारत होते. देशातील कुठल्याही पत्रकाराची आजपर्यंत हिंमत झाली नसेल असा प्रश्न विचारायची. पंतप्रधानजी आपण आंबा खाता का ? चोखून खाता का कापून खाता ? काय प्रश्न विचारलाय आमच्या पंतप्रधानांना. काय मजाक लावलाय ? सरकारवरती ही जनता अवलंबून असताना, यांचा मजाक चालू आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच पंतप्रधान मोदींनी जे गाव दत्तक घेतले तिथे नाले ओसंडून वाहत आहेत, प्यायचे पाणी शुद्ध नाही, ग्रामपंचायतीचे कार्यालय नाही, कॉलेज नाही, धड रस्ते नाहीत, गावात रोगराई पसरली आहे. पंतप्रधान मोदीजी स्वतः दत्तक घेतलेले गाव सुधारू शकले नाही ते देश काय सुधारणार. असा टोलाही यावेळी राज ठाकरेंनी लगावला.

You might also like