आशुतोष भाकरेनं का उचललं टोकाचं पाऊल ? पोलिसांना नाही मिळाली ‘सुसाईड नोट’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : खुलता कळी खुलेना या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरे यानं आत्महत्या केल्याची घटना कालच (बुधवार दि 29 जुलै 2020) समोर आली आहे. राहत्या घरी गळफास घेऊन आशुतोषनं त्याचं जीवन संपवलं. आशुतोष एक नवोदीत कलाकार होता. त्याच्या अचानक जाण्यानं सर्वजण हादरले आहेत. नांदेड येथील राहत्या घरात त्यानं गळफास घेतला. डिप्रेशनमुळं त्यानं हे पाऊल उचललं असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

कुटुंबातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष भाकरे यानं बुधवार दि 29 जुलै 2020 रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोषचे आई वडिल नांदेडमधील फेमस डॉक्टर आहेत. पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परंतु त्यांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्यानं या प्रकरणाचा तिढा आणखी वाढला आहे. नैराश्येतून त्यानं हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

साधारण एका महिन्यापूर्वी आशुतोषनं फेसबुकवरून आत्महत्या संदर्भात भाष्य करणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. एका डॉक्टरांचा हा व्हिडीओ होता. आपण एखाद्याला आत्महत्या करण्यापासून कशा प्रकारे वाचवू शकतो यावर डॉक्टरांनी भाष्य केलं होतं. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता आशुतोष आधी पासूनच कोणत्या तरी विचारात होता असे तर्क वितर्क लावले जाताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं ?
नांदेडमधील गणेश नगर येथील घरी मयुरी आणि आशुतोषची आई गप्पा मारत होत्या. यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ आशुतोष खाली आला नाही हे पाहून घरातल्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा घरातल्यांनी बाजूनं जाऊन खोलीत डोकावलं तेव्हा आशुतोषचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. आशुतोषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं काही मराठी सिनेमात काम केलं आहे. भाकर, इच्यार ठरला पक्का असे त्यानं काम केलेले काही सिनेमे सांगता येतील. जून-जुलै या बहुचर्चित नाटकाची निर्मितीही त्यानं केली होती.