Video : ‘अभिमानानं सांगा मनसे नेमकं काय करतेय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण तसेच कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद पहावयाला मिळतो आहे. त्यातच मनसेचं नेमकं काय सुरु आहे ? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याच अनुषंगाने मनसेने एक साडेपाच मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत ‘अभिमानाने सांगा मनसे नेमकं काय करतेय,’ अशी टॅग लाइन वापरली आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या त्या क्षेत्रात नेमकं काय काम केलं याबाबतची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. त्यात मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी टाळेबंदीत अन्नपुरवठा आणि पीपीई किट दिल्याचं सांगितलं. मनसेचे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि मोफत खते देण्याचं काम केल्याचं व्हिडिओत सांगण्यात आलं. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी कोरोना दरम्यान लाखोंची बिल वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांना दणका देत बिले कमी केल्याचं सांगत, रुग्णांना तात्काळ बेड्स उपलब्ध करुन दिल्याचंही नमूद केलं.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोफत बसेस उपलब्ध करुन दिल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं. तर अमेय खोपकर यांनी या संकट काळात चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या पाठीशी ठाम उभं असल्याचं सांगितलं. माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे अन्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवास करण्यास मुभा मिळावी म्हणून प्रयत्न करत असल्याचं म्हणाले. त्याशिवाय बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, गोरगरिबांना अन्नधान्य देणे, पुण्यात ११ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे, नगरमध्ये भाजीपाला आणि बियाणांचा पुरवठा, बेस्ट कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप. वीज दरवाढी विरुद्ध आंदोलन, वाहतूकदारांना त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यायांविरोधात आक्रमक भूमिका आणि मंदिर प्रवेश मिळण्यासाठी केलेला प्रयत्न आदी कामाचा उल्लेख या मनसेच्या व्हिडिओत केला आहे.

कोणासोबत बरोबरी नाही – राज ठाकरे
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हडिओच्या सर्वात शेवटी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. मी कुणाचीही बरोबरी अथवा तुलना करत नाही. पण माझ्या सैनिकांनी मागील चार महिन्यात प्रचंड काम केलं. नागरिकांना दोन वेळेचा डब्बा आणि चहा देण्यापासून ते त्यांची औषधपाण्याची करण्यापर्यंत माझा मनसे सैनिक रस्त्यावर होता, असं राज ठाकरे म्हणाले.