‘नाईट लाइफचे तारणहार मंत्रिमंडळात असताना गर्दीवर कारवाईची पालिकेची काय बिशाद ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  –  गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ होत आहे. तरीदेखील मुंबईमधील काही नाईट क्लबमध्ये नियम झुगारून गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान नाईट क्लबमध्ये होणाऱ्या या गर्दीवरून नाईट लाईफसाठी आग्रही असणारे राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, नाईट लाईफचे तारणहार राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असताना मुंबईतल्या नाईट क्लबमधल्या तुफान गर्दीवर कारवाईची मुंबई महापालिकेची काय बिशाद? पर्यावरणाच्या रक्षणासाठी नाईट क्लबची नितांत गरज असावी, असा टोला भातखळकर यांनी ट्विट करून लगावला आहे.

दरम्यान, मुंबईतील नाईट क्लबमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही गर्दी होत असल्याचे काही वृत्तांमधून समोर आले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळीमधील एका क्लबमधून मनसेने फेसबूक लाइव्ह केले होते. गेल्या महिन्यापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्याने लॉकडाऊनची भीती व्यक्त केली जात आहे.