आघाडीत बिघाडीची चर्चा ! शरद पवारांच्या नव्या विधानामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीत ‘धुसफूस’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक घडामोडीनंतर राज्यात सरकार स्थापन झाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस या तीन पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडी स्थापन करण्यात आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणण्याची मोठी जबाबदारी पार पाडली. मात्र, आता शरद पवारांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी मंत्रिपदाच्या वाटपाबद्दल समाधानी आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार नसतात, असे शरद पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. मागील आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडीनं बहुमतदेखील सिद्ध केलं. मात्र, उपमुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप खाते वाटप झालेले नाही. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी उपमुख्यमंत्रीपदावरुन भाष्य केल्याने आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राष्ट्रवादीला मंत्रीपदाच्या वाटपात काय मिळालं असा प्रश्न शरद पवारांना एका वृत्तवाहीने विचारला होता. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीकडे शिवसेनेपेक्षा केवळ दोन आमदार कमी आहेत. मात्र, आमच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा दहाने जास्त आहे. शिवसेनकडे मुख्यमंत्रीपद आहे. तर काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद आहे. मात्र, माझ्या पक्षाला काय मिळाले ? उपमुख्यमंत्र्याकडे कोणतेही अधिकार नसतात, असे शरद पवारांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रीपदासाठी अद्याप कोणाचेही नाव जाहीर केले नाही.

Visit : policenama.com