‘मी मुख्यमंत्री नाही, राज्य कसं चावलायचं ते उद्धव ठाकरे ठरवतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मी काही मुख्यमंत्री नाही. राज्य कसं चालवायचं याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ऐकायचं की लोकनियुक्त पुढाऱ्यांचं हा त्यांचा अधिकार आहे. त्याबद्दल कुणीही बॅकसीट ड्रायव्हिंग करणं योग्य नाही, असं स्पष्ट मत राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत ही नाराजी फक्त काँग्रेसपुरती मर्यादित होती. मात्र, आता राष्ट्रवादीचे नेतेही नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन आणि आघाडीतील कुरबुरी बाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं मत मांडलं. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

लॉकडाऊन निर्णयाबाबत संभ्रम

लॉकडाऊनच्या बाबत कुठलाही स्पष्ट निर्णय घेणं सोपं नाही. एका बाजूला रोजगार वाचवायचे आहेत. अर्थव्यवस्था रुळावर आणायची आहे आणि दुसरीकडे लोकांचे जीव वाचवायचे आहे. हे धर्मसंकट आज जगासमोर आहे. महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढत आहे. औषधांच्या बाबतीत संभ्रम आहे. केंद्रानं राज्य सरकारवर जबाबदारी ढकल्यामुळे राज्य सरकारं आपापल्या परीनं निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एकदम 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय कसा घेतला याबाबत संभ्रम नक्कीच आहे. आतापर्यंत आपण 15-15 दिवसांचा निर्णय घेत होतो. अचानक महिनाभर लॉकडाऊन वाढवला आहे. एकिकडे अनलॉक सुरु असताना अचानक 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय कशा प्रकारे घेतला गेला याबाबत चर्चा सुरु आहे. उद्यापर्यंत यावर स्पष्टता येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

बॅकसीट ड्रायव्हिंग करू नये

कोरोना हे संकट अभूतपूर्व आहे. माझ्या कार्यकाळात किंवा इतर कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात असे संकट आलं नव्हतं. आपण दुहेरी कचाट्यात अडकलो आहोत. त्यामुळे इतर कोणीही बॅकसीट ड्रायव्हिंग करू नये. मुख्यमंत्र्यंना आम्ही सूचना करत असतो आणि तेही आमचा सल्ला घेत असतात. प्रत्येकाची मत वेगवेगळी असतात. शेवटी खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीला निर्णय घ्यावा लागतो, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांभाळून घेतले.