पुणे शहराने ‘पवारांना’ काय दिले, शरद पवार यांची खंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहरातील एसपी कॉलेजच्या इमारतीसह इतरही अनेक महत्त्वाच्या वास्तू नरहर गणपत पवार या वास्तूविशारदाने बांधल्या आहेत. पण, पुण्याने पवारांना काय दिले, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘माणदेशाने महाराष्ट्राला ग.दि. माडगूळकरांचे साहित्यिक दिले. मात्र पुण्याने त्यांचा सन्मान केला नाही. म्हणून मी बारामतीला ग. दी माडगूळकर या नावाने मोठं सभागृह बांधलं.’
आता माझ्या राजकीय जीवन प्रवासाला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मला राजकारणाची आणि संघटन बांधणीची आवड पुण्यातील विद्यार्थी निवडणूकातून लागली. पुण्यात ‘पवार पॅनल’च्या माध्यमातून ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला आलेल्या मुलांचे संघटन उभारून आम्ही विद्यार्थी निवडणूक जिंकलो होतो. ते पुण्यातील दिवस खूप चांगले होते, असे शरद पवार म्हणाले तेवढ्यात सुधीर गाडगीळ यांनी प्रसंगावधान दाखवून आता पुण्याचे नेतृत्व करायला आवडेल का ? असा प्रश्न विचारला त्यावर शरद पवार यांनी आता निवडणूका नाहीत असे उत्तर देऊन मूळ प्रश्नाचे उत्तर देणे मुत्सद्दीपणे टाळले.
आज पुण्यात  कॉफीटेबल बुक  ‘पुणे एकेकाळी ‘आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री  शरद  पवार यांच्या हस्ते तर माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची ‘आठवणीतले पुणे’ या विषयावर सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली त्यावेळी शरद पवार बोलत होते. लेखक मंदार लवाटे, पेपरलीफचे संस्थापक जतन भाटवडेकर या वेळी उपस्थित होते.
शरद पवार यांनी पानशेत धरण फुटल्याने झालेल्या नुसकानीच्या आठवणीला उजाळा दिला. शरद पवार यांना शिकवायला असलेले शारीरिक शिक्षणाचे शिक्षक त्याचे घर पानशेतच्या पुरात वाहून गेले होते. सर रोज रडत बसत असत तेव्हा त्यांना मुले धीर देण्यासाठी समजुतीचे संवाद करत असत. तेव्हा सर मुलांना म्हणाले कि मला घर बुडाल्याचे दुःख झाले नाही, तर पुराच्या पाण्यात जर्मनी ऑलंपिकमध्ये मिळालेले पदक वाहून गेले आहे त्याचे दुःख मला झाले आहे. यातून सरांची असलेले खेळा संदर्भातील प्रेम आणि राष्ट्रभक्ती दिसून आली, असे शरद पवार म्हणाले.
पुण्यातील कोणते पदार्थ तुम्हाला आवडतात असे श्रीनिवास पाटील यांना मुलाखतकारांनी विचारले असता पाटील यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली कि, मला एस पी कॉलेज समोरील चहा, बटाटे वडे खायला आवडतात. तेव्हा शरद पवार मधेच म्हणाले ‘पाटील कासमचा खिमा विसरलात का?’ या वाक्या बरोबर सभागृह हास्य कल्लोळात नाहून गेले. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून आज अखेर पर्यंतच्या पुणे शहरातील अनेक आठवणीना उजाळा देखील दिला.  शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची आजची मुलाखत म्हणजे पुणेकरांसाठी पर्वणीच होती.