मातोश्रीवर जाण्यामध्ये कमीपणा कसला ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? असा थेट प्रश्न विचारत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या टिकेला उत्तर दिले. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामावर समाधानी असल्याचे देखील स्पष्ट केले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टिका करताना म्हंटले होते की, शरद पवार गेल्या आठवड्यात दोन ते तीन वेळा मातोश्रीवर गेले आहेत. हे बरोबर नाही. त्यांच्या वयाचा मान राखत त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांनी मातोश्रीवर हेलपाटे मारण्याची वेळ आणणे योग्य नाही. यावर उत्तर देताना मंगळवारी पवार यांनी म्हंटले की, मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या कामावर समाधानी आहोत.

पुण्यातील मार्केट शिफ्ट करण्याचा सकारात्मक विचार

पत्रकार परिषदेपूर्वी पवार यांनी पुण्यातील व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी पदाधिकार्यांनी पवार यांच्यापुढे आपल्या मागण्यांचा पाढाच वाचला. त्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करू अशी ग्वाही पवार यांनी दिली. तसेच पुण्यातील मार्केट शिफ्ट करण्याची व्यापार्यांची तयारी आहे. मेट्रो, कर्मचार्यांच्या निवासाची सुविधा यासाठी मोठी जागा लागणार आहे. त्याविषयी महसूल खाते जागेची माहिती देऊ शकेल, या संदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यावर उद्याच बैठक होईल. व्यापार्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यांच्याकडून माहिती घेऊनच निर्णय घेतला जाईल असेही पवार यांनी सांगितले.