‘त्यांच्या’वर बोलण्यापेक्षा ५ वर्षात काय केले ते सांगा : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५० टक्के भाषणं गांधी आणि नेहरू परिवारावर असतात. मात्र सत्तेत आल्यापासून त्या ५ वर्षात काय केले हे सांगत नाहीत. अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. फतेहपूर सीकरीमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल पार पडले. येत्या २९ एप्रिलला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान काँग्रेसतर्फे फतेहपूर सीकरीमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर भाषणं ऐकली तर त्यांची ५० टक्के भाषणं ही नेहरूंनी हे केले, इंदिरा गांधींनी ते केले. मात्र सत्तेत आल्यापासून ५ वर्षात काय केले हे सांगत नाही. असे प्रियंका गांधी यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढत असलेल्या वाराणसी मतदार संघातून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तसेच जर पक्षाने तिकीट दिले तर वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी तयार असल्याचे त्यांनी म्हंटले होते. मात्र काँग्रेसने अद्यापही वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींविरोधात प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.