आप सरकार सोबत दिल्लीत जे घडतंय ते लोकशाहीस धोकादायक –  शिवसेना 

दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारच्या विरोधात  ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला काँग्रेस सोडून  अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र केजरीवाल यांच्या आंदोलनाला काँग्रेसन पाठिंबा दिलेला नाही.
अशा परिस्थितीत  या आंदोलनाला आता भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवाल यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असल्याची अधिकृत माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
केजरीवालांनी सुरू केलेलं आंदोलन हे अतिशय वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन आहे. तसेच दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांना निवडून दिलं आहे. दिल्लीसाठी काम करण्याचा अधिकार त्यांना जनतेनं दिला आहे. सरकार लोकशाहीनं निवडून आलं असल्यामुळे त्यांच्यासोबत जे घडतं आहे, ते लोकशाहीसाठी पोषक नाही असं देखील राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान केजरीवाल यांच्या आंदोलनाला शिवसेनेच्या अगोदर  चार राज्यांच्या  मुख्यमंत्र्यांनी  पाठिंबा दिला आहे. यामध्ये केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा समावेश आहे. भाजपा सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने ही भूमिका घेतल्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधान आलं आहे.