खुशखबर ! आता WhatsApp वर मिळणार ‘पेमेंट सर्व्हिस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सर्वात जास्त वापर होणारे मॅसेंजर ऍप व्हाट्सअप आता डिजिटल पेमेंट देखील सुरु करणार आहे. आज दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या एका कार्यक्रमात कंपनी याची घोषणा करणार आहे. कंपनीकडून  याविषयी अद्याप  कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी या नवीन फिचर आणि सेवेची घोषणा करू शकते.

व्हाट्सअपचे प्रमुख  विल कैथकार्ट या आठवड्यात भारत दौऱ्यावर आहेत. भारताचा त्यांचा हा पहिलाच दौरा असून त्यांनी नुकतेच हे पद सांभाळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स एंड इनफॉर्मेशन टेक्नॉलजीच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत. गुरुवारी होणाऱ्या या कार्यक्रमात विल कैथकार्ट यांच्याबरोबर नीती आयोगाचे अध्यक्ष  अमिताभ कांत हे देखील उपस्थित  राहण्याची शक्यता आहे.

दोघे मिळवून व्हाट्सअपविषयी नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर  ‘व्हाट्सअप पे’ या नवीन सेवेची देखील दोघे घोषणा करण्याची शक्यता आहे. विल कैथकार्ट आपल्या भारत दौऱ्यात दिल्ली आणि मुंबईमधील लहान आणि माध्यम व्यापाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर डेटा लोकलाइजेशन वर कंपनीने उचललेल्या पावलांवर देखील ते चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या नवीन सेवेविषयी अद्यापपर्यंत व्हाट्सअप आणि प्रसारण मंत्रालयाकडून देखील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र कंपनीच्या प्रवक्त्याने याविषयी बोलताना म्हटले होते कि, कैथकार्ट डिजिटल इंडियाला समर्थन देण्यासाठी सरकारी आधीकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत.