कौतुकास्पद ! एकाच कुटुंबातील 5 पैकी 3 मुली IAS- IRS तर दोन इंजिनिअर

बरेली : पोलीसनामा ऑनलाईन – मुलगी नको मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, अशी धारणा आजही समाजामध्ये आहे. त्यामुळेच स्त्री भ्रूण हत्यासारख्या घटना आजही आपल्या समाजात घडताना दिसत आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील एका कुटुंबांतील मुलींनी आपणही मुलापेक्षा कमी नाहीत, त्या देखील मुलांप्रमाणेच, किंवा त्यांच्यापेक्षाही मोठे यश मिळवू शकतात हे दाखवून दिले आहे. येथील एकाच कुटुंबातील 5 मुलींपैकी 2 आयएएस अधिकारी व 1 मुलगी आयआरएस अधिकारी आहेत. तर, उर्वरीत दोन मुली इंजिनिअर बनून नोकरी करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिले कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या. फरीदपूर तालुक्यातील या कुटुंबात 5 मुलींचा जन्म झाल्यानंतरही आनंद होता. पण, गावातील आणि समाजातील काही लोकांकडून मुलींच्या जन्मामुळे टोमणे मारण्यात येत होते. 5 मुली झाल्यामुळे समाज व नातेवाईकांकडून खासगीत बोलताना, काय मुलींना आयएएस बनवणार आहात का? असेही बोलले जात होते. मात्र, कुटुंबीयांनी मुलींना उच्च शिक्षण देत ते खरे करून दाखवले. चंद्रसेन यांच्या 5 पैकी तीन मुलींनी युपीएससी परीक्षा पास केली आहे.

चंद्रसेन सागर यांच्या 5 मुलींपैकी 3 मुलींनी युपीएससी परीक्षा पास केली असून दोन मुली आयएएस अधिकारी आहेत. तर, तिसरी मुलगी आयआरएस अधिकारी आहे. विशेष म्हणजे इतर दोन मुलींनीही इंजिनिअरची पदवी घेतली असून त्याही इंजिनिअर बनल्या आहेत.

चंद्रसेन यांच्या मुलींच्या शिक्षणाची सुरुवात बरेली येथील सेंट मारिय कॉलेजमधून झाली. त्यानंतर, उत्तराखंड, इलाहाबाद आणि दिल्ली येथे जाऊन पुढील उच्च शिक्षण घेतले. तिन्ही बहिणींनी दिल्लीत राहून आपले युपीएससी स्पर्धा परिक्षेच शिक्षण घेतले. चंद्रसेन यांची पहिली मुलगी अर्जित 2009 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर, मुंबईतील जॉईंट कमिश्नर कस्टम कार्यालयात रुजू झाली. अर्जित यांचे लग्न आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाले असून तिचे पतीही आयएएस अधिकारी आहेत. 6 वर्षानंतर म्हणजेच 2015 मध्ये चंद्रसेन यांच्या दुसऱ्या मुलीनेही आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. अर्पित असे तिचे नाव असून त्या सध्या वालसाड येथे डीडीओ पदावर कार्यरत आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरच्या दोन्ही मुली इंजिनिअर असून त्या मुंबई आणि दिल्लीत जॉब करत आहेत.

मुलीनी घेतली मामापासून प्रेरणा
चंद्रसेन आणि मीना यांच्या 5 व्या नंबरच्या मुलीनेही युपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. आकृतीने 2016 साली दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा पास केली. सध्या ती पाणी महामंडळाच्या संचालपदी रुजू आहेत. चंद्रसेन यांच्या मुलींना त्यांच्या मामापासूनच युपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचे मामा अनिल कुमार हे 1995 सालच्या युपीएससी परीक्षेतून आयपीएस अधिकारी बनले होते. त्यामुळे, आपणही आपल्या मामाप्रमाणेच मोठ अधिकारी व्हायचे असे स्वप्न या मुलींनी पाहिले होते. मामा अनिल कुमार यांनीही आपल्या भाच्चींना मदत आणि मार्गदर्शन केले, त्यामुळेच मुलींनीही आई-वडिलाचे आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले आहे.