WhatsApp मध्ये धोकादायक ‘बग’, कायमस्वरूपी डिलीट होतात ‘मेसेज’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सायबर सिक्युरिटी फर्म चेकपॉइंटच्या तज्ज्ञांनी WhatsApp मध्ये एक घातक बग शोधून काढला आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप मध्ये आणखी एक उणीव असल्याचे समोर आले आहे. हा बग धोकादायक असून यामुळे हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून अ‍ॅप क्रॅश करु शकतात. एकदा अ‍ॅप क्रॅश झाल्यानंतर अ‍ॅप अनइंस्टॉल करुन पुन्हा डाउनलोड करावे लागते.

याबाबत चेकपॉइंटच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हॅकर्सने जर ग्रुप चॅटमध्ये एखादा मेसेज टाकला तर एकाचवेळी अनेक स्मार्टफोनमधील अ‍ॅप क्रॅश होऊ शकते. याचा अनेकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण संभाषण आणि मेसेजसाठी हे अ‍ॅप जगभरात मोठ्याप्रमाणात वापरले जाते. जगात १५० कोटीपेक्षा जास्त लोक व्हॉटसअ‍ॅप वापरतात. तर १० कोटीपेक्षा जास्त ग्रुप्स आहेत. सुमारे ६५ अब्ज मेसेज पाठविण्यासाठी दररोज व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होतो.

महत्त्वाचे म्हणजे या बगमुळे ग्रुप चॅट क्रॅश झाले की, त्यासोबत चॅट हिस्टरी सुद्धा डिलीट केली जाते. जोपर्यंत अ‍ॅप अनइंस्टॉल केले जात नाही तोपर्यंत अ‍ॅप क्रॅश होत राहते. पुन्हा इंस्टॉल केल्यानंतर युजर्स ग्रुप चॅटमध्ये जाऊ शकणार नाहीत किंवा हिस्टरी पाहू शकणार नाहीत. या बग बाबत माहिती व्हॉट्सअ‍ॅपला देण्यात आल्यानंतर कंपनीने हा बग फिक्स केला आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/