विरोधानंतर झुकले WhatsApp, नवीन अटी आणि धोरण स्वीकारण्यासाठी ठरलेली 8 फेब्रुवारीची डेडलाइन ‘स्थगित’

वॉशिंग्टन : टिका आणि विरोधाचा सामना करावा लागल्यानंतर इंस्टंट मॅसेजिंग अ‍ॅप्लीकेशन व्हॉट्सअपने ( WhatsApp ) आपली नवी डेटा-शेयरिंग पॉलिसी सध्या स्थगित केली आहे. नवीन पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन जास्त होते, ज्यामुळे यूजर्सचा व्हॉट्सअप ( WhatsApp ) डेटा फेसबुककडून सुद्धा शेयर केला गेला असता. व्हॉट्सअपवर ( WhatsApp ) फेसबुकची पूर्ण मालकी आहे. व्हॉट्सअपच्या या गोपनीयतेच्या धोरणाने त्रस्त होऊन यूजर्स त्यांचे प्रतिस्पर्धी टेलीग्राम आणि सिग्नलवर शिफ्ट होत होते.

नवीन अटी आणि धोरण स्वीकारण्यासाठी ठरलेली 8 फेब्रुवारीची अंतिम तारीख व्हॉट्सअपने सध्या रद्द केली आहे. व्हॉट्सअपने म्हटले की, ते प्रायव्हसी आणि सुरक्षेबाबत यूजर्समध्ये पसरलेला गैरसमज दूर करतील.

एका ब्लॉगपोस्टमध्ये व्हॉट्सअपकडून लिहिण्यात आले आहे की, आम्हाला अनेक लोकांकडून ऐकायला मिळाले की, आमच्या अलिकडच्या अपडेटबाबत गैरसमजाची स्थिती पसरली आहे. या अपडेटद्वारे आम्ही फेसबुकसोबत पहिल्यापेक्षा जास्त डेटा शेयर करणार नाही.

यापूर्वी सुद्धा एका ब्लॉगद्वारे व्हॉट्सअपने स्पष्टीकरण दिले होते की, आम्ही कुणाचे मॅसेज किंवा कॉल पाहू शकत नाही आणि फेसबुकसुद्धा.

व्हॉट्सअपने 4 जानेवारीला ’इन-अप’ अधिसूचनेद्वारे गोपनीयता धोरण जाहीर करत आपल्या यूजर्सला सेवेच्या अटी आणि गोपनीयतेच्या धोरणाबाबत अपडेट देण्यास सुरू केले होते. व्हॉट्सअपने यामध्ये सांगितले होते की, ते कशाप्रकारे यूजर्सचा डेटा प्रोसेस करतात आणि त्यांना फेसबुकसोबत कशाप्रकारे सामायिक करतात. अपडेटमध्ये हे सुद्धा म्हटले होते की, व्हॉट्सअपच्या सेवांचा वापर जारी ठेवण्यासाठी यूजर्सना आठ फेब्रुवारी 2021 पर्यंत नवीन अटी आणि धोरणाशी सहमत व्हावे लागेल.

जगभरातील उद्योग जगतातील अनेक दिग्गजांसह मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी या पावलावर चिंता व्यक्त केली होती. भारतात व्हॉट्सअप यूजर्सची संख्या 40 कोटीपेक्षा जास्त आहे.