आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही करता येईल पेमेंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपवर आता चॅटिंग बरोबरच ऑनलाइन पेमेंटही करता येणार आहे. लवकरच व्हॉट्सॲपही डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी इतर डिजिटल पेमेंट अ‍ॅप्सना टक्कर देण्यासाठी भारतात लवकरच ‘व्हॉट्सअ‍ॅप पे ’हे अ‍ॅप लाँच करणार असल्याची घोषणा केली.

भारतात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. व्हॉट्सअ‍ॅप पेच्या माध्यमातून कंपनी डिजिटल पेमेंटच्या स्पर्धेत उतरणार आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी व्हॉट्सॲपकडून पेमेंट सुविधेची चाचणीही करुन घेण्यात येणार आहे. या अ‍ॅपचं भारतात टेस्टिंग सुरू आहे. ते यशस्वी झाल्यानंतरच हे अ‍ॅप अनेक देशात लाँच करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागू शकतो याबाबत कोणतीच माहिती त्यांनी दिली नाही. नव्याने सादर करण्यात येणाऱ्या ‘व्हॉट्सअ‍ॅप पे’वरून होणारे व्यवहारही गुप्तच राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

‘व्हॉट्सअ‍ॅप पे’ ही ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ अर्थात ‘एनपीसीआय’ तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘यूपीआय’वर काम करते. या माध्यमातून ग्राहक एकमेकांना रक्कम हस्तांतर करतात. व्हॉट्स अ‍ॅपमध्ये नवं पेमेंट फीचर ऑप्शन दिलं जाईल. या पेमेंटवर क्लिक करताच तुम्ही यूपीआय पेजशी जोडले जालं. त्यानंतर युपीआय किंवा बॅंक अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करता येईल.