पंजाब आंदोलनामुळे महाराष्ट्राकडे गव्हाचा पुरवठा मंदावला

पुणे – केंद्र सरकारने कृषी सुधारणा कायदा लागू केल्यापासून त्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. आंदोलनाचा सर्वात जास्त जोर पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात आहे. पंजाबमधील आंदोलनामुळे रेल्वे आणि अन्य वाहतूक सेवा जवळजवळ ठप्प आहेत. गहू उत्पादनात पंजाब हे देशातील एक नंबरचे राज्य आहे आणि गव्हासठी महाराष्ट्र हे पंजाबचे मोठे ग्राहक आहे. पंजाबमधील विस्कळीत वाहतुकीमुळे महाराष्ट्रात होणारा गव्हाचा पुरवठा मंदावला आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्यात अन्नधान्याचा तुटवडा भासू देणार नाही अशी ग्वाही दिली.

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आटा, रवा, मैदा यासाठी पंजाबमधील गहू वापरला जातो. सणासुदीच्या काळात या तिन्ही वस्तूंना मागणी असते पण, मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नसल्याने आटा, रवा, मैदा निर्मितीचे मालक आंदोलन संपून व्यवहार सुरळीत होण्याची वाट पहात आहेत. आंदोलनाचे नेते गहू आणि अन्य धान्याचा पुरवठा फार काळ रोखून धरणार नाहीत अशी मिल मालकांना आशा आहे.

पुण्यातील धान्य व्यापारी प्रवीण चोरबेले यांनी सांगितले की पंजाबमधून येणाऱ्या गव्हाबाबत मिल मालकांपुढे प्रश्न आहेत. परंतु पुण्याच्या बाजारात मध्यप्रदेशातील इंदोर आणि मंदसौर येथून गहू येतो. विदर्भ, जळगांव, नगर येथूनही गहू येतो त्यामुळे पुण्यात रोजच्या वापरासाठीच्या गव्हाची टंचाई जाणवणार नाही