जेव्हा १७ वर्षांपूर्वी ‘इंडिया टुडे’च्या कव्हर पेजवर लिहिले होते ‘घृणा के नायक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय मॅगझिन ‘टाइम’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिले. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून ‘इंडियाज डिव्हायडर इन चीफ’ भारताला तोडणारा प्रमुख असा करण्यात आला आहे. हे मासिक सध्या बाजारा उपलब्ध नसले तरी यावर चर्चा सुरु आहेत. याच दरम्यान १ मे २००२ च्या अंकाचे कव्हर पेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कव्हर पेजवर असलेल्या मोदींच्या फोटोच्या खाली ‘घृणा के नायक’ असे लिहण्यात आले आहे. या फोटोवर काही मजकूर लिहण्यात आला आहे यामध्ये ‘घटक पक्षातील नेत्यांची नाराजी, विरोधकांचा संताप आणि देशात होत असलेले मतांचे ध्रुवीकरण या सर्व गोष्टी असतानाही मोदी हे भाजपा साठी नवे प्रेरणास्त्रोत बनले आहेत’.

नरेंद्र मोदी हे गुजराचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्या कार्यकाळात गुजरामध्ये दंगल झाली होती. २७ फेब्रुवारी २००२ रोजी सकाळी जेव्हा आयोध्येतून अहमदाबादला जाणारी साबरमती एक्सप्रेस गोधरा रेल्वे स्टेशनवर आली त्यावेळी बोगी एस ६ मधून आगीचे लोट बाहेर पडत होते. या बोगीत असलेल्या ५९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती तसेच राज्यातील काही भागांमध्ये मुस्लिमांविरोधात संघर्षाच्या घटना घडल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी २००२ मध्ये अहमदाबादच्या नरोदा पटिया परिसरात दंगल माजली. यामध्ये ९७ मुसलमानांची हत्या करण्यात आली. तसेच गुलबर्ग हाऊसिंग सोसायटीत दंगेखोरांनी घुसून सोसायटीमधील ६९ लोकांची हत्या केली. मृत व्यक्तींमध्ये काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचा समावेश होता. गुजरामध्ये वाढत्या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीसऱ्या दिवशी सैन्याला पाचारण करण्यात आले.

या घटनांना तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा पाठींबा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच मोदी सरकारमधील मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांनी या दंगलीचे नेतृत्व केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही घटना घडली त्यावेळी केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. दंगली नंतर वाजपेयी घटनास्थळांची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वाजपेयी यांनी मोदींनी राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला. इंडिया टुडेने १ मे २००२ च्या अंकामध्ये गुजरातच्या दंगलीवरून मोदींवर कव्हर स्टोरी केली होती. या अंकाच्या पहिल्या पानावरील मोदींचा फोटो छापून त्याखाली घृणा के नायक असा उल्लेख केला होता.