HBD : जेव्हा एका थप्पडने बदलले होते ललिता पवार यांचे जीवन, मंथराच्या भूमिकेमुळे झाल्या होत्या प्रसिद्ध

नवी दिल्ली : टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ’रामायण’मध्ये मंथराची भूमिका करून घराघरात प्रसिद्ध झालेल्या ललिता पवार यांचा आज वाढदिवस आहे. ज्यांनी-ज्यांनी रामायण पाहिले आहे, ते दासी ’मंथरा’ला कधीही विसरू शकत नाहीत. नाटकात आपण पाहिले होते की कशाप्रकारे त्या कैकईला श्रीरामाविरूद्ध भडकवतात. ललिता पवार यांनी इतका चांगला अभिनय केला होता की लोक त्यांना खरी मंथरा समजू लागले होते. मंथराचा उल्लेख होताच ललिता पवार यांचा चेहरा समोर येतो…अशी होती त्यांच्या अभिनयाची जादू.

ललिता पावार यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते आणि त्या तरूणपणी खुपच सुंदर दिसायच्या. त्या आपल्या काळातील सर्वात जास्त पैसे घेणार्‍या अभिनेत्री होत्या, परंतु एका अपघाताने त्यांच्या सौंदर्यावर डाग लागला. ही घटना 1942 मध्ये ’जंग-ए-आजादी’ चित्रपटाच्या शुटिंगवेळी घडली होती. ललिता यांना अभिनेते भगवान दादा यांच्यासोबत एक थप्पड मारण्याचे दृश्य चित्रित करायचे होते. भगवान दादा यांच्याकडून चुकून ललिता यांना इतक्या जोरात थप्पड मारली गेली की त्यांच्या कानातून रक्त वाहू लागते. असे म्हणतात की, कानाच्या उपचाराच्या दरम्यान डॉक्टरांनी ललिता बाई यांना चुकीचे औषध दिले होते, ज्यामुळे ललिता पवार यांच्या उजव्या बाजूला लकवा मारला होता.

बॉलीवुडच्या या दिग्गज अभिनेत्रीचे खरे नाव अंबिका होते. त्यांच्या नावाच्या पाठीमागे सुद्धा एक खास किस्सा आहे. जेव्हा ललिता यांची आई प्रेग्नंट होती तेव्हा ती अंबामातेच्या मंदिरात गेली होती आणि तिथेच त्यांना बाळंतकळा सुरू झाल्या. तेव्हा मंदिराच्या बाहेर जन्म झाल्याने त्यांचे नाव अंबिका ठेवले गेले. परंतु, चित्रपटाच्या आवश्यकतेनुसार त्यांनी आपले नाव बदलून ललिता ठेवले. त्यांनी आई आणि सासूच्या भूमिकांनी आपली खास ओळख निर्माण केली होती.

ललिता यांच्या चित्रपटातील आगमनाचा किस्सा सुद्धा मजेदार आहे. एकदा त्या आपल्या वडीलांसोबत चित्रपटाची शूटिंग पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथे असलेले दिग्दर्शक नानासाहेब यांचे लक्ष ललिता यांच्याकडे गेले, तेव्हा नानासाहेब यांनी ललिता यांना ’राजा हरिश्चंद्र’ चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका दिली. अवघ्या 9 वर्षाच्या वयात ललिता यांनी अभिनय करण्यास सुरूवात केली. त्यांचा पहिला संवादाचा चित्रपट ’हिम्मत-ए-मर्दा’ होता, जो 1935 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्या खुप बोल्ड भूमिकेत दिसल्या होत्या.