१५ हजार रुपयांची लाच स्विकारताना दोन नायब तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – मलमा वाहतूक करणारे टिप्पर सोडल्याच्या बदल्यात १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन नायब तहसीलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) दुपारी तहसील कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे तहसील कार्य़ालयात खळबळ उडाली आहे. महसूल विभागातील दोन बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे महसूल विभाग एसीबीच्या रडारवर आला आहे.

राजश्री राजाराम मलेवार (वय -४४) व तिलकचंद टिकाराम बिसेन (वय -५५) असे लाचखोर नायब तहसीलदारांचे नाव आहे. याप्रकरणी टिप्पर मालकाने गोंदिय लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांचा मलमा वाहतूक करणारा टिप्पर नायब तहसीदार राजश्री मलेवार यांनी पकडून दंडात्मक कारवाई न करता सोडून दिला होता. त्याचा मोबदला म्हणून मलेवार यांनी २७ हजार ५०० रूपयांची मागणी केली. याबाबत नायब तहसीलदार बिसेन याने तक्रारदारांसोबत बोलणी करून मलेवार यांच्यासाठी रक्कमेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रूपयांवर बोलणी झाली. मात्र तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी करून आज तहसील कार्यालयात सापळा लावला. यात बिसेन याला मलेवार यांच्यासाठी १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.