जखमी अवस्थेत ‘बिग बी’ अमिताभ पोहोचले होते ऋषी कपूर यांच्या लग्नात !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांचे 30 एप्रिलला निधन झाल्यानंतर याची माहिती सर्वात आधी अमिताभ बच्चन यांनी दिली होती. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटरवरून ऋषी कपूर आता या जगात राहिले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान, अमिताभ यांनी एक ब्लॉग लिहिला होता ज्यात त्यांनी ऋषी कपूर यांच्या लग्नातले काही किस्से शेअर केले होते. ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ जखमी अवस्थेत पोहोचले होते.

ऋषी कपूर यांच्या लग्नाच्या काही दिवस आधीच अमिताभ चेन्नईमध्ये त्यांच्या एका सिनेमाचे शूटिंग करत होते. यादरम्यान एका अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. ज्यामुळे त्यांना नीतू आणि ऋषी कपूर यांच्या लग्नात हाताला पट्टी बांधूनच सहभागी व्हावे लागले होते. बीग बी एका सिनेमाच्या गाण्याचे शूट करत होते. ज्यात दोरीच्या मदतीने स्लाइड करत खाली यायचे होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा हात सुटला आणि ते खाली पडले. ज्यामुळे त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी अमिताभ यांच्या हाताला प्लास्टर केले. त्यानंतर नीतू आणि ऋषी कपूर यांचे लग्न सुद्धा होते. त्यामुळे अशाच अवस्थेत मित्राच्या लग्नासाठी अमिताभ बच्चन मुंबईला रवाना झाले आणि हाताला पट्टी बांधलेल्या अवस्थेतच ते लग्नात सहभागी झाले.