…जेव्हा गृहमंत्र्यांची स्कुटर होते ‘अनबॅलेन्स’

नागपूर : शहर पोलीस दलात दाखल झालेल्या सेल्फ बलेन्सिंग स्कुटर चालविण्याचा मोह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना झाला. त्यांनी स्कुटर चालविण्यास सुरुवात केली. काही क्षणात ही सेल्फ बॅलेंसिंग स्कुटर अनबलेन्स झाली. सुदैवाने पोलिसांनी तातडीने धाव घेत तिचा बॅलेन्स साधला.

नागपूर पोलीस दलात १० सेल्फ बॅलेंसिंग स्कुटर दाखल झाल्या आहेत. त्याचे पोलीस दलाकडे हस्तांतरण करण्याचा समारंभ शनिवारी सायंकाळी पोलीस जिमखान्यावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अनिल देशमुख होते. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांना या सेल्फ स्कुटरवरुन शानदार सलामी दिली. त्यानंतर या स्कुटरची ट्रायल घेण्याचा मोह गृहमंत्री देशमुख यांना झाला. त्यांनी बॅलेंसिंग स्कुटरचा ताबा घेतला़ व ती चालविण्याचा प्रयत्न केला. पण या स्कुटरवर बॅलेन्स करणे पहिल्या प्रयत्नात सर्वांना जमतेच असे नाही. जर ते जमले नाही तर चालक उलटा पडण्याची शक्यता असते. गृहमंत्र्यांनी स्कुटर चालविण्यास सुरुवात करताच ती अनबॅलन्स झाली. ती हलू लागल्याने गृहमंत्रीही हलू लागले. हे पाहून बाजूच्या पोलिसांची एकच धावपळ झाली. त्यांनी स्कुटर पकडून ती बॅलेन्स केली आणि पुढच्या काही क्षणात गृहमंत्री स्कुटरवरुन खाली उतरले आणि पुढचा अनर्थ टळला.