दिलासादायक ! प्रथमच भारतीय तज्ज्ञांनी सांगितलं, ‘कोरोना’ची माहामारी कधी नष्ट होणार ते

पोलीसनामा ऑनलाइन – भारतात कोरोनाचे आकडे रोज नवे उच्चांक गाठत आहेत. शनिवारी देशात ९३,३३७ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर १२४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येने ५३ लाखांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लसीकडे लागलं आहे. अशातच भारतीय तज्ज्ञांनी एक सकारात्मक अशी माहिती सांगितली आहे.

कोरोनाचा प्रभाव कधी कमी होईल यासंदर्भात भारतीय तज्ज्ञांनी पहिल्यांदाच अंदाज वर्तवला आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, पुढील वर्षी देश कोरोनाच्या संकटातून बाहेर आला असेल. अर्थात पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत कोरोना संसर्गाचे संकट कमी होईल. जवनजीवन सुरळीत होईल असा दावा एम्सचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. संजय राय यांनी केला आहे.

संजय राय यांनी सांगितलं, “भारतात लशीचे दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. जर सर्व काही सुरळीत पार पडलं तर जगात तयार होत असलेल्या कोरोना लसींपैकी कोणतेही लस पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होईल. मात्र, लस नाही आली तरी पण पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सर्वकाही सामान्य होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण जोपर्यंत कोरोनाविरुद्ध प्रभावी लस उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मास्क वापरणं, हातांची स्वच्छता असे प्रतिबंधात्मक उपाय केल्याशिवाय आपणांस कोणताही पर्याय नाही.”

पुढील वर्षी कोरोना लस, पण … आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं
संसदेत बोलताना आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले, पुढील वर्षी कोरोना संसर्ग विरुद्ध लस तयार उपलब्ध होणार आहे. मात्र, ती सर्वांपर्यंत पोहचण्यास वेळ लागले. कोरोनावर मात करण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं अतिशय महत्वाचं आहे, असे त्यांनी राज्यसभेत सांगितलं. त्यावेळी विरोधकांनी कोरोना लसीच्या उपलब्धतेसोबत तिच्या किंमतीबाबत अनेक सवाल उपस्थित केले.

तसेच ‘कोरोनाचा सामना करताना देशात पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स आणि मास्कचा तुटवडा भासेल, असे अनेकजण म्हणत होते. वृत्तवाहिन्यांवर त्याबाबत चर्चा सुरु होत्या. पण आपण या लढाईत फार पुढे आलो. सध्या देशात शेकडो कोरोना तपासणी केंद्र आहेत. केंद्र सरकारने कोणताही भेदभाव न करता सर्व राज्यांना मदत आणि सहकार्य केलं.,’ असे हर्षवर्धन यांनी सभागृहात म्हटलं.