निवडणुका आल्या की पळापळ, पश्चात्ताप झाला की घरी..!

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसतर्फे सोलापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सुशिलकुमार शिंदे सोलापूरात आले आहेत. यावेळी त्यांना माढा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या पडझडीबद्दल विचारले असता, निवडणुका आल्या की पळापळ होते. आणि नंतर पश्चाताप झाल्यानंतर पुन्हा आपल्या घरी यायचे, असा टोला मोहिते पाटील यांचे नाव न घेता लगावला.

भाजपकडून नवा चेहरा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, निवडणूक ही एक प्रकारची युद्धभूमीच आहे. त्यात समोर कोण आहे, याचा विचार न करता त्याला सामोरे जायचे असते. या निवडणुकीत माझ्यासमोर महाराज येऊ दे नाहीतर आणखी कोणी पॉवरफुल. मला लोकसभेचे निवडणूक रणांगण नवीन नसल्याचे सांगत आपणच विजयी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीसारखा मी आता गाफील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील जाहीर सभेत यंत्रमागाचे उदाहरण दिले होते. टेक्स्टाईल इंडस्ट्री इतकी मोठी असताना शिंदे यांनी काय केले ? अशी टीका त्यांनी केली होती. हम करेंगे असे आश्वासन देऊन साडेचार वर्षांत एक मीटर कापड खरेदी केलेले नाही. मोदींची आश्वासने फेल गेली आहेत.