भारत जिंकल्यावर लाराने मारली मिठी, म्हणाला – ‘आपण जिंकलो, गावसकरने मुलाखतीत सांगितली प्रतिक्रिया’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. टीम इंडियाने मिळवलेला विजय हा सर्वात विशेष आहे. यानंतर याचा आनंद केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातील दिग्गजांना झाला आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम विजयाचा आनंद वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ब्रायन लारा याने भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्याकडे शेअर केला. एका मुलाखतीत गावसकर यांनी लाराला भारतीय संघाच्या विजयाबद्दल किती आनंद झाला होता हे सांगितले आहे.

गावसकर या मालिकेत समालोचन करत होते. ते म्हणाले की, चॅनल द्वारे पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी लारा माझ्याजवळ आला आणि तो मोठ्याने आपण जिंकलो, आपण जिंकलो, काय शानदार मालिका होती. काय, शानदार मालिका होती, असे म्हणू लागला. भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाच्या आठवणींसह मी आयुष्यभर आनंदी राहीन.

मला आता चंद्रावर असल्यासारखे वाटत असल्याचे लारा त्यांना म्हणाला, असे गावस्कर यांनी एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे. लाराने दिलेल्या या प्रतिक्रियेवरून ही मालिका किती रोमांचक होती याचा अंदाज येतो. वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंनादेखील भारताला विजय मिळावा असे वाटत होते. भारतीय संघाने मिळवलेला हा विजय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम मालिका विजय आहे यात दुमत असण्याचे कारण नाही, असे गावसकर म्हणाले.