‘तो’ काशीचा खासदार कसं काम करतोय ? , PM मोदींनीच बैठकीत केला भाजप प्रदेशाध्यक्षांना प्रश्न, सर्वजण आश्चर्यचकीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) घेतली. राज्यातील स्थिती आणि खासदारांच्या कामगिरीचा आढावा यावेळी मोदींनी घेतला. मोदींनी भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू असलेल्या कामाची माहिती या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी मोदींच्या एका प्रश्नामुळे सगळ्यांनाच काहीसा धक्का बसला. पण त्यानंतर साऱ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदी काशीचे (वाराणसी) खासदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे मोदी उत्तर प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षांकडे स्वत:च्या कामगिरीबद्दल विचारणा करत होते. ही बाब लक्षात येताच प्रदेशाध्यक्षांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. मोदींनी २०१४ मध्येही वाराणसीतून निवडणूक लढवली होती. तेव्हाही ते विजयी झाले होते. याशिवाय त्यांनी वडोदऱ्यातूनही निवडणूक लढवली होती.

भाजपच्या बैठकीला उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधत असताना मोदींनी काशीचा खासदार कसं काम करतोय, असा प्रश्न विचारला. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोदींनी काशीच्या खासदाराच्या कामगिरीबद्दल विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मोदींनी भाजप प्रदेशाध्यक्षांनी अचानक विचारलेल्या प्रश्नानं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं,’ अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं दिली.