‘तो’ सोहळा पवारांनी लाईव्ह पाहिला… आणि टीव्ही बंद केला

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे खंदे शिलेदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. साहजिकच मोठ्या राजकीय परंपरा असलेले घराण्याने आज भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. एवढेच नाही तर विजयसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. असे असताना मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय करत असतील असा प्रश्न सर्वांच्याच मनात आला असेल.

मोहिते पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठं घराणं. याच घराण्याच्या वारसाने जेव्हा राष्ट्रवादी सोडून भाजपचा झेंडा हातात घेतला तेव्हा हा सर्व सोहळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार टिव्हीवर लाईव्ह पाहत होते. त्याचवेळी मात्र सोलापूरमधल्या नेत्यांची बैठक बोलावली होती. शरद पवारांनी शांतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचं भाषण ऐकलं आणि मग टीव्ही बंद केला. अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. दरम्यान या कार्यक्रमावेळी भाजपचे मंत्री सुभाष देशमुख यांनी तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांची नोंदणी करून घेतली हे देखील पवारांनी पाहिलं त्यानंतर त्यांनी टिव्ही बंद केला. त्यानंतर सोलापुरातील नेत्याच्या मिटिंगसाठी ते मार्गस्थ झाले. या बैठकीला बबनदादा शिंदे, रश्मी बागल, राम राजेनाईक निंबाळकर यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

Loading...
You might also like