१० हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरिक्षक जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले. पांडुरंग गणपत पिठे (वय ३८, रा. सहायक पोलीस निरीक्षक, वाकोला पोलीस ठाणे) असे त्याचे नाव आहे.

तक्रारदार हा इस्टेट एजंट आहे. त्याच्याविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पांडुरंग पिठे याच्याकडे होता. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती़. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली. त्यांनी २ डिसेंबर रोजी त्याची पडताळणी केली. त्यात पिठे यांनी २० हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी वाकोला पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून या लाचेपैकी १० हजार रुपये स्वीकारताना पांडुरंग पिठे यांना पकडण्यात आले आहे.