२ लाख ८० हजाराची लाच घेताना सरपंच आणि उपसरपंच अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

घरपट्टीची नोंद करुन त्याची पावती देण्यासाठी 2 लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी एका सरपंचासह उप सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. चक्क गावच्या सरपंचासह उप सरपंचालाही अटक केल्यामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मछिंद्र चंद्रकांत कराळे (वय 44 वर्ष , सरपंच, ग्रामपंचायत आंबवणे, ता. मुळशी), गणेश गजानन मानकर ( वय 39 वर्ष, उप सरपंच, ग्रामपंचायत आंबवणे, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबात सविस्तर वृत्त असे की, आरोपींनी तक्रारदाराकडे घरपट्टीची नोंद करुन त्याची पावती देण्यासाठी 3 लाखांची मागणी केली होती. शेवटी तडजोड करुन 2 लाख 80 हजार रुपयांना काम ठरले. या बाबतची अधिकृत तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर एसीबीने सापळा रचून संबंधीत आरोपींना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली.

सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांनी केली.