२५ हजार रुपयाची लाच घेतांना आरोग्य सेविका अॅन्टी करप्शनच्या जाळयात

सिल्लोड (औरंगाबाद ) : पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य विभागात नोकरी लावून देते असे सांगून ५ लाखाची मागणी केली. त्यापैकी २५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना आरोग्य सेवीकेस अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  ही करावाई आज (बुधवारी) दुपारी पंचायत समिती आवारात करण्यात आली. सुनिता किसन चंडोल (वय-३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे.

आरोपी सुनिता चंडोल या आरोग्य विभागात सेविका या पदावर कार्यरत आहे. त्यांनी आरोग्य विभागात सेवक पदी नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन तक्रारदारास ५ लाखाची मागणी केली. यातील ४ लाख ७० हजार रूपये आरोपीने यापुर्वीच घेतले आहेत. आज यातील राहिलेल्या रक्कमेतील २५ हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली. यावरून आज दुपारी पंचायत समिती परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापाळा रचला. यावेळी २५ हजाराची लाच घेताना पथकाने आरोपी चंडोलस रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक शंकर जिरगे, पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोलीस हवालदार गणेश पंडुरे, विजय बाम्हंदे, पोलीस नाईक रवींद्र अंबेकर, पोलीस शिपाई सुनिल पाटील यांनी केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.