आदेश आल्यानंतरच पुण्यात नव्या दराने दंडवसुली : पोलीस उपायुक्त पंकज देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोटर वाहन कायद्यातील सुधारित दंडाच्या रक्कमेबाबत राज्य सरकराने अद्याप अधिसूचना प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे पुणे शहरामध्ये जुन्या दरानेच दंडवसुली होणार असल्याचे पुणे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणे शहरातच नाही तर राज्यात देखील जुन्या दरानेच दंड वसुली होणार आहे.

दरम्यान, प्रचलित दंडाच्या रकमेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. ही आर्थिक दंडवसुली राज्य सरकारला अमान्य असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी सांगितलं आहे. मोटार वाहन कायद्यात केंद्र सरकारने बदल केले आहेत.

बदल केलेल्या नियमांनुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाकडून पूर्वीपेक्षा तिप्पट ते पाचपट दंड वसुल करण्यात येणार आहे. नव्या नियमांची अंमलबजावणी देशात सुरु असून नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वी दंडाच्या रकमेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्यात आला आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने दंडाच्या रकमेची अंमलबजावणी करण्याबाबत राज्याच्या विधी विभागाचा सल्ला मागविला आहे.

याबाबत पुण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, राज्य सरकाने सुधारीत दांडाच्या वसुलीचा आदेश पाठवला नाही. हा आदेश आल्यानंतर सुधारीत दंडानुसार दंडवसुली करण्यात येईल. मात्र, सध्या जुन्या दरानुसारच दंड वसुली केली जाईल. तसेच राज्य सरकारकडून आदेश आल्यानंतर ई-चलानसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनमध्ये देखील बदल करण्यात येतील.