दहावी, बारावीच्या परीक्षा कधी होणार ? बच्चू कडूंनी दिली महत्वाची माहिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दहावी, बारावी परीक्षा नेमक्या कधी होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या परिक्षांबाबत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, 10 वी आणि 12 वी ची परिक्षा महत्वाच्या आहेत. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा आम्ही पुढील बैठकीत घेऊ. परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरू आहे.

येत्या 2 किंवा 3 फेब्रुवारीला बैठकीत नियोजन करुन चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल असे मंत्री कडू म्हणाले. गेल्या वर्षभरापासून देशात आणि राज्यात कहर केलेल्या कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. तसेच कोरोनाच्या लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई वगळता इतर विभागातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग काही काळापूर्वी सुरू झाले होते. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधीच जाहीर केले आहे.

दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात घेण्याचा विचार सुरू असल्याचं वर्षा गायकवाड यांनी याआधी म्हटले होते. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.